नागपूर - एकाच कुटुंबातील पाच सदस्यांची चाकूने भोकसून हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः आत्महत्या केल्याच्या घटनेने आज संपूर्ण नागपूरसह राज्य हादरून गेले आहे. आरोपी आलोक माटूरकर याने अतिशय थंड डोक्याने हे षडयंत्र रचले होते. याचा खुलासा तपासादरम्यान झाला आहे. काही दिवसांपूर्वी मेहूणीसोबत झालेल्या वादाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने आरोपीने स्वतःच्या कुटुंबाला का संपवले, या बाबीचा खुलासा होऊ शकलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी आरोपी आलोकच्या नातेवाईकांकडे चौकशी करून काही सुगावा मिळतो का, याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी मृतक आरोपी आलोकच्या घरातूनच चाकू जप्त केला आहे.
मेहूणीसोबतच्या वादात कुटुंब संपवले -
आलोक अशोक माटूरकर हा मूळचा अमरावती येथील रहिवासी आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वीच तो पत्नी आणि मुलांबळांसह नागपूरला स्थायिक झाला होता. आलोक आणि त्याची पत्नी घरी शर्ट शिवण्याचे काम करायचे, त्यानंतर आलोक ते शर्ट बाजारात विकायचा. व्यवसायात जम बसवण्याचा प्रयत्नात असतात काही दिवसांपूर्वी कौटुंबिक कारणावरून त्याची मेहूणी आमिषा बोबडे सोबत वाद झाला. आलोक हा गरजेपेक्षा जास्त आमिषाच्या आयुष्यात ढवळाढवळ करत असल्याने दोघांमध्ये सुरू असलेली धुसफूस प्रचंड प्रमाणात वाढली होती. त्यातूनच अलोकने आमिषाला मारहाणदेखील केली होती. त्यामुळे तिने तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आलोकला अटक सुद्धा केली होती. त्यानंतर दोघांमध्ये बोलचाल देखील बंद झाली. हाच राग मनात धरून आरोपीने योजना तयार करून पत्नी विजया, मुलगी परी, मुलगा साहिलसह सासू लक्ष्मी बोबडे आणि आमिषावर चाकूने वार करून त्यांची हत्या केली.
दोन कुटुंबातील केवळ एकच व्यक्ती बचावला -
आरोपी अलोकने स्वतःचे संपूर्ण कुटुंब संपवल्यानंतर सासरी जाऊन सासू आणि मेहूणीचा खून केला. यादरम्यान त्याचे सासरे नाईट शिफ्ट ड्युटीवर असल्याने ते केवळ या दोन कुटुंबात सुखरूप बचावले आहेत. महत्त्वाचे म्हणजे सकाळी जेव्हा ते घरी आले, तेव्हा त्यांची पत्नी लक्ष्मी आणि मुलगी आमिषा एका खोलीत मृतावस्थेत पडून होते. ते झोपले आहेत समजून त्यांना उठवण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. अंघोळ करून ते आपल्या कामा निमित्ताने बाहेर निघून गेले. मात्र, ज्यावेळी घरी परत आले तेव्हा आपली पत्नी आणि मुलीचा खून झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत पलीकडून जावयाने मोठ्या मुलीसह दोन्ही नातवंडांचा खून केल्याची बातमी त्यांच्या कानी पडली. तेव्हापासून त्यांना जबर मानसिक धक्का बसला आहे.
हेही वाचा - मराठमोळ्या स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटकरी घायाळ, सोशल मीडियावर केवळ स्मृतीचीच चर्चा