नागपूर - मैत्री दिनाच्या दिवशी सुरू असलेल्या सेलिब्रेशन दरम्यान एका तरुणाच्या मैत्रीणी (गर्लफ्रेंड)च्या विषयावरून निर्माण झालेल्या वादातून नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरी नगरच्या बागेत एका तरुणाची निर्घृण हत्या झाली आहे. अनिकेत भोतमांगे (वय 21 वर्षे), असे मृत तरुणाचे नाव आहे. अनिकेतचा खून केल्यानंतर त्याच्याच मित्रांनी त्याला मेयो रुग्णालयात दाखल करून हा खून नसून अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या तपासात आरोपींनी केलेला बनाव उघडकीस आला आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी काही तासातच पाच आरोपींना अटक केली आहे.
या घटनेतील मृत अनिकेत भोतमांगे हा काही वर्षांपूर्वी हिवरी नगरमध्ये कुटुंबासह राहत होता. त्यानंतर त्याचे कुटुंब गड्डीगोदाम भागात राहण्यासाठी गेले होते. मात्र, अनिकेतचा मित्र परिवार हिवरी नगर भागात असल्याने तो नेहमी याच भागात रमायचा. तीन दिवसांपूर्वी अनिकेत त्याच्या मित्रांसोबत फ्रेंडशिप डे साजरा करत असताना मैत्रिणीचा विषय निघाला. त्यावेळी अनिकेत आणि इतर आरोपींमध्ये शाब्दीक वाद झाला होता. मंगळवारी (दि. 3 ऑगस्ट) रात्री अनिकेत त्याच्या दोन मित्रांसोबत पुन्हा हिवरी नगरच्या गार्डन परिसरात आला असता आधीच तयार असलेल्या काही जणांनी त्याला घेराव घालून मारहाण केली. याच दरम्यान एकाने धारधार शस्त्राने वार करून अनिकेतला जखमी केले.
खून केल्यानंतर अपघात दाखवण्याचा प्रयत्न
आरोपींनी अनिकेतला रक्ताच्या थारोळ्यात लोळवल्यानंतर काहींनी त्याला अपघात झाल्याचे सांगून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनिकेतची तब्येत फारच गंभीर असल्याने कोणत्याची रुग्णालयाने त्याला दाखल करून घेतले नाही. अखेर आरोपींनी अनिकेतला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी अनिकेतला तपासून मृत घोषित केले. तेवढ्यात सर्व आरोपींनी पळ काढला. याबाबत माहिती मिळताच नंदनवन पोलिसांनी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - आदिवासी बांधवांना खावटी वाटपाच्या कार्यक्रमात आमदारांनी घेतला अधिकाऱ्यांचा क्लास, व्हिडिओ व्हायरल