नागपूर - इतिहासात प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचं आयोजन नागपूरच्या बाहेर करण्यात आलं आहे. यंदा बंगळुरूमध्ये प्रतिनिधी सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. १९ आणि २० मार्चला आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह यांची देखील निवडणूक पार पडणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.
केवळ ४५० व्यक्तींनाच बैठकीत सहभागी होता येणार-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात निर्णय घेणाऱ्या सर्वोच्च अशा प्रतिनिधी सभेचं आयोजन १९ व २० मार्चला बंगळुरू येथे करण्यात आले आहे. दर तीन वर्षांनी नागपुरात आयोजित होणारी संघाची ही बैठक संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच नागपूरच्या बाहेर आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वी गेल्यावर्षी बंगळुरू येथेच होणारी संघाची ही बैठक कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली होती. संघाच्या २९ संलग्न संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतात. प्रतिनिधी सभेत सुमारे दीड हजारांवर व्यक्ती अपेक्षित असतात परंतु कोरोनाचे सावट असल्याने यावेळी केवळ ४५० व्यक्तींनाच बैठकीत सहभागी होता येणार आहे. तर संघाच्या ४४ प्रांताचे प्रतिनिधी ऑनलाईन माध्यमाने सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे यंदा तीन दिवसांऐवजी दोन दिवसांचीच बैठक आयोजित करण्यात आली आहे.
प्रतिनिधी सभेचे महत्त्व-
प्रतिनिधी सभा म्हणजे एकप्रकारे आरएसएसची संसद अशी मान्यता आहे. सरसंघचालकानंतर सरकार्यवाह हे आरएसएस मध्ये दुसऱ्या क्रमांकाचे पद आहे. त्याची निवड देखील याच सभेत केली जाते. आरएसएसमध्ये सरकार्यवाह या एकमेव पदासाठी निवडणूक प्रक्रिया घेतली जाते. आरएसएसमध्ये कार्यकारी अधिकार हे सरकार्यवाह यांना असतात. १९ मार्चला दुसऱ्या सत्रात नवे सरकार्यवाह निवडले जातील. एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास निवडणूक घेतली जाईल.
सरकार्यवाह बदलाला जाणार का-
दर तीन वर्षांनी होणाऱ्या या बैठकीत गेल्या तीन वर्षाचा लेखाजोखा मांडण्यात येईल. मागील तीन वर्षात संघकार्याचा विस्तार, ग्रामविकास, पर्यावरण, सामाजिक परिवर्तनाचा विचार करून ज्या योजना आखल्या होत्या त्यावर या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा होणार आहे. २००९ पासून सरकार्यवाह पदाची धुरा सांभाळणारे भैय्याजी जोशी हेच या पदावर कायम राहणार की नवे सरकार्यवाह पदावर येणार याविषयी देखील उत्सुकुता आहे.
संघ केंद्राच्या कामगिरीवर खुश-
२०१४ पासून सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदींनी आरएसएसच्या अजेंड्यावर असलेले अनेक मुद्दे मार्गी लावल्याने आरएसएस केंद्र सरकारच्या कामगिरीवर खुश आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन असो किंवा चीन सोबत असलेला तणाव, देशातील यासारख्या सद्य परिस्थितीवर देखील या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा- एनआयएच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई; शरद पवारांच्या भेटीनंतर अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण