नागपूर - मुंबई मेट्रो कारशेडचा प्रश्न आणखी गंभीर होताना दिसत आहे. मेट्रो कारशेड बुलेट ट्रेनसाठी असलेल्या बीकेसीच्या जागी नेण्याचा विचार म्हणजे पोरखेळ असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, माहित नाही कोण या सरकारचा सल्लागार आहे, हा सल्लागार राज्याला बुडवायला निघाला आहे. सरकारचं कामकाज म्हणजे मुंबईकरांना मेट्रोपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
बीकेसीच्या जागेला भाजपचा विरोध
राज्य सरकारने मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जागा निवडली होती. मात्र या जागेला न्यायालयाकडून स्टे देण्यात आल्यानंतर राज्य सरकार पर्यायी जागेचा शोध घेत आहे. यासाठी राज्य सरकार बीकेसीच्या जागेचा विचार करत असल्याची चर्चा आहे. मात्र भाजपने बीकेसीच्या जागेला विरोध केला आहे. बिकेसीची जागा ही प्राईज लँड आहे, त्यामुळे मेट्रोसाठी आवश्यक असलेली जागा महागात जाईल. अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
न्यायालयाचा आदर राखा
कांजूरमार्ग येथे होणाऱ्या मेट्रो कारशेडला न्यायालयाने स्टे दिल्यानंतर, शिवसेना नेते संजय राऊत यांनी न्यायालयाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. राऊत यांनी न्यायालयाचा आदर राखावा असे त्यांनी म्हटले आहे.