यवतमाळ - एखादा रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून शालेय विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे पत्र लिहीत आपल्या भावना भूपृष्ठ वाहतूक मंत्र्याकडे व्यक्त केल्याची कदाचित ही पहिलीच घटना असेल. (Eight thousand students sent a letter to Gadkari) हा रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून सर्वच स्तरातून प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून विद्यार्थ्यांनी माननीय केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भावनिक साद घालत आपल्या मनातील भीतीच्या वादळाची जणू जाणीव करून दिली आहे.
"साहेब आम्ही रस्ता ओलांडतो तेव्हा आम्हाला भीती वाटते", "रोज आमच्या समोर अपघातात कोणी ना कोणी मरते," "उद्या कुणाचा नंबर लागणार असे भीतीचे ढग सतत डोक्यात घोंगवतात," आपला परिचित, सगा सोयरा, नातेवाईक की पुढे आपलाच नंबर येईल का या भीतीतून आम्ही रोज या मार्गावरून ये जा करीत असतो. आजपर्यंत हा रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून आम्ही भावना शून्य नेत्यांच्या मागे धावलो आमच्या भावनांचा अनादरच झाला. आमच्या आशा केवळ आपल्यावरच आहे. आपणच आमचे विघ्नहर्ता होऊ शकता. रस्ते अपघाताची मालिका आपणच थांबवू शकता. हा रस्ता नव्हे हा तर मृत्यूचा सापळा आहे. यातून आम्हा प्रवाशांचे जीवनदाते तुम्हीच होऊ शकता असही त्यामध्ये म्हणाले आहेत. शासन आणखी किती जणांचे बळी गेल्यावर, कुटुंब उघड्यावर पडल्यावर या रस्त्याकडे पाहणार? रस्ते अपघाताची मालिका खंडित होणार नाही का?, मृत्यूच्या या सापळ्यापासून सुटका कोणीच करणार नाही का? असे हजारो प्रश्न व आर्जव चिमुकल्यांनी आपल्या तोडक्या मोडक्या भाषेत पत्रातून लिहीत गडकरी साहेबांच्या पुढ्यात व्यक्त केल्या. या गंभीर विषयात विद्यार्थ्यांनी अक्षरशः गडकरींकडे पत्रांचा जणू पाऊस पाडला.मध्यप्रदेश, महाराष्ट्र व आंध्रप्रदेश अशा तीन राज्यांना जोडणारा राज्य महामार्ग क्रमांक 14 हा शेवटची घटका मोजतोय. तब्बल दोन दशकापासून या रस्त्याची केवळ डागडुजी सुरू आहे. हा रस्ता आता प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरलाय. जागोजागी पडलेले जीवघेणे खड्डे, रोज होणारे अपघात, प्रवाशांना मृत्यूच्या दाढेत नेत आहेत. हा रस्ता राज्य महामार्गाकडून राष्ट्रीय महामार्गाकडे अपग्रेडेशनसाठी प्रस्तावित आहे. विदर्भातील विविध पक्षीय राजकीय नेत्यांच्या अनास्थेपाई या रस्त्याचा विषय दुर्लक्षित आहे. राज्य तसेच केंद्रात असलेल्या लोकप्रतिनिधींच्या बोलघेवडेपणाचे हा रस्ता प्रतिक आहे. या रस्त्या संदर्भात राज्यातील आमदार, मंत्री व खासदारांनी केवळ जनतेला मौखिक आश्वासने देत दिशाभूल केली आहे. शासन स्तरावर पाठपुरावा करण्यास मात्र कोणीही पुढे आले नाही. माजी मंत्री आमदार संजय राठोड, आ. प्रताप अडसड यांनी याबाबत पाठपुरावा केला. मात्र त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. या रस्त्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्गासाठी असूनही नवनीत राणा व्यात्रिक्त इतर खासदाराने याकडे लक्ष दिले नाही.महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या राज्यसीमेवरील अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील भोकरबर्डी पासून सुरू होत हरिसाल, सिमाडोह, परतवाडा, अमरावती, बडनेरा, नांदगाव खंडेश्वर, नेर, यवतमाळ, उमरी येथे संपणार होता. या रस्त्याची एकूण लांबी 303 किमी आहे. यातील 229 किमी रस्ता हा सपाट भूप्रदेशातून जातो. 30 किमी रस्ता नागमोडी वळणाचा तर 44 किमी रस्ता पर्वतीय भागातून जातो. हा रस्ता पांढरकवडा तालुक्यातील करंजी जवळील राष्ट्रीय महामार्ग 7 वर जोडल्या जाणारा आहे. यासाठी रस्ते परिवहन मंत्रालयाने एनएचएआय (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला) या मार्गाच्या उपयुक्तततेसह सविस्तर अहवाल बनवायला सांगितला होता. त्यानुसार मार्क टेक्नोक्राट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी समवेत मंगलम असोसिएटसने आर्थिक आणि तांत्रिक व्यवहार्यता सर्वेक्षण अहवाल तयार केला.
मध्यंतरी केंद्र सरकारने बीआरटीएस योजनेमध्ये भारतमाला परीयोजनेअंतर्गत उत्तर व दक्षिण कॉरीडोर जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. त्या अनुषंगाने हा मार्ग 2016 मध्ये राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषीत झाला होता. मात्र, यानंतर दृढ राजकीय इच्छाशक्तीअभावी केंद्रातील भाजपा सरकारने याकडे दुर्लक्ष केले. उत्तर व दक्षिण कॉरीडोर जोडण्याच्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या बीआरटीएस योजनेमध्ये भारतमाला परीयोजने अंतर्गत फक्त जिल्ह्यांना जोडणारा नव्हे तर मध्यप्रदेश, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या तीन प्रमुख राज्यांना जोडण्यासाठी यवतमाळ अमरावती जिल्ह्यामधून जाणाऱ्या या रस्त्याचा समावेश होता हे विशेष.