नागपूर - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीचा छापा पडला आहे. नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे देशमुख यांचे वडिलोपार्जित घर आहे. त्या ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. या ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांची सर्च मोहीम सुरू केली आहे.
देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ-
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने जोरदार धक्का दिला आहे. देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांची तब्बल चार कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून नुकतीच जप्त करण्यात आली आहे. शंभर करोड रुपये वसुली प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या अगोदर अनिल देशमुख यांच्या दोन निकटवर्तीयांना देखील याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता त्यांच्या कोटोल येथील वडलोपार्जित घरावर ईडीकडून छापेमारी सुरू करण्यात आली आहे.
सचिन वाझेंनी अनिल देशमुखांना पैसे दिले-
100 कोटी वसुली प्रकरणात ईडीकडून सचिन वाझेची चैकशी सुरू आहे. त्या चौकशीत वाझेंनी अनिल देशमुख यांना बार मालकांकडून वसुली करून पैसे दिले असल्याचे म्हटले आहे. बार मालक जया पुजारी आणि महेश शेट्टी या दोघांनीही गुड लक मनी म्हणून डिसेंबर महिन्यात 40 लाख वाझेला दिले होते, जे त्याने अनिल देशमुखांना दिले, असेही वाझेने ईडी चौकशीत मान्य केले आहे. ईडीने आतापर्यंतच्या तपासात 50 ते 60 करोड रुपयांच्या ट्राजेक्शनची माहिती मिळवली आहे. काही पैसे हे वाझे सीआययुमध्ये असलेल्या हायप्रोफायईल प्रकरणांच्या तपासादरम्यान जमवण्यात आल्याचाही ईडीला संशय आहे.