नागपूर - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नागपुरात सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाचा शिरकाव आता महानगरपालिकेच्या मुख्यालय आणि झोन कार्यालयापर्यंत झालेला आहे. अधिकारी आणि कर्मचारी देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय व झोनमध्ये दररोज विविध कामासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. विविध भागातील नागरिकांच्या येण्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महानगरपालिकेचे स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन विभागाशिवाय इतर विभागांकडून नागरिकांना अत्यावश्यक सेवा दिली जाते. मात्र, आता कोरोनाचा शिरकाव मनपाच्या विविध विभागात झाला असल्याने नागरी सेवा काही प्रमाणात बाधीत होण्याची शक्यता आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेत पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुख्यालय तसेच झोन कार्यालयामध्ये नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय येण्याचे टाळावे, असे आवाहन केले आहे.
नागपूर लाईव्ह सिटी अॅपचा वापर करण्याचे आवाहन…
तसेच नागरिकांना मनपाच्या कोणत्याही अत्यावश्यक कामाविषयी तक्रार असल्यास मनपाचे "नागपूर लाईव्ह सिटी" मोबाईल ॲप वर तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे. "नागपूर लाईव्ह सिटी" या ॲपद्वारे नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याबाबत मनपा प्रयत्नशील असून त्यासाठी नागरिकांना मनपामध्ये येण्याची कोणतीही आवश्यकता राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना कोविड-१९ संबंधी तक्रार असल्यास महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील दुरध्वनी क्र. ०७१२-२५६७०२१, २५५१८६६ तसेच पाणी पुरवठा व चोकेज संबंधी तक्रारी असल्यास ०७१२-२५६५५०९ वर संपर्क साधावा असेही, आवाहन करण्यात आले आहे.