नागपूर - सोमवारी वर्ध्यातील हिंगणघाट येथे प्राध्यापक तरुणीवर पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. सर्व स्तरांमधून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. राज्यभरात मोर्चे तसेच निषेध यात्रा काढण्यात आल्या.
सध्या या तरुणीवर नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिच्या प्रकृतीची माहिती देण्यासाठी आज डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेतली. पीडित तरुणी जवळपास 40 टक्के भाजल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामध्ये तिच्या फुप्फुसांना गंभीर इजा पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच सध्या पीडितेची प्रकृती चिंताजनक असून आठवडाभरात यासंबंधी पूर्ण माहिती समोर येईल, असे ते म्हणाले. सध्या उपचार योग्य दिशेने चालू असून येणाऱ्या सात दिवसांत प्रकृतीबाबत अधिक चित्र स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकृती पूर्ववत होण्यासाठी अद्याप बराच वेळ असून या प्रकारच्या घटनांमध्ये अनिश्चितता असल्याने प्रकृती आणखी गंभीर होऊ शकते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.