नागपूर - ६५ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी पवित्र दीक्षाभूमी सज्ज झाली आहे. तिथी नुसार धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा उद्या (15 ऑक्टोबर) असला तरी आज तारखेनुसार धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्याने अनुयायांनी दीक्षाभूमीवर गर्दी केली आहे. दरम्यान संपूर्ण नागपूर शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.
पोलीस यंत्रणा सज्ज -
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा रद्द करण्यात आला होता, मात्र आता कोरोनाचा प्रभाव ओसरल्यामुळे यावर्षी प्रशासनाने काही नियम आणि अटी शर्ती घालून परवानगी दिली आहे. त्यानुसार दीक्षाभूमीवर अठरा वर्षांखालील तरुणांना आणि ६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना परवानगी नाकारण्यात आली आहे. पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने एका शिफ्ट मध्ये १२०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय १०० सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत अशी माहिती नागपूर शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.
विजयादशमीच्या दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात अनुयायी -
दीक्षाभूमी स्मारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांच्या आस्थेचे केंद्र आहे. १४ ऑक्टोबर १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीच्या मैदानावर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस होता विजयादशमीचा. त्यामुळे या भूमीचे नाव दीक्षाभूमी असे झाले. २००१ साली त्याठिकाणी भव्य स्तूपचे निर्माण करण्यात आले आहे. दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकर अनुयायी दीक्षाभूमीवर येत असतात.
दीक्षाभूमीत चोख सुरक्षा व्यवस्था -
धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याला दरवर्षी सुमारे पाच लाख अनुयायी येतात,यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे संख्या कमी राहील अशी शक्यता असली तरी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यामध्ये दोन शिफ्ट मिळून सुमारे २५०० पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय होमगार्ड आणि स्वयंसेवक देखील सज्ज झाले आहेत.
हेही वाचा - रावणाने नागपुरातील 'या' कुटुंबाच्या जगवल्या सात पिढ्या