नागपूर - राज्यात सर्वात कमी मृत्यदर असलेल्या नागपुरात आता कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या दिवसेगणिक वाढत आहे. त्यामुळे मृत्यूदरही वाढीस लागला असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. गेल्या महिन्यात केवळ अर्ध्या टक्क्यांवर असलेला मृत्यू दर, आता दोन टक्यांचा पल्ला गाठण्याच्या दिशेने जात असल्याचे दिसून येत आहे.
उपराजधानी नागपूरात कोविड-१९ मुळे मागील तीन महिन्यात केवळ ११ मृत्यूची नोंद होती. मात्र, नागपुरात मागील दीड महिन्यात ४२ मृत्यू झाले आहेत. यामध्ये नागपूर ग्रामीण क्षेत्र आणि बाहेर जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश आहे. सध्या नागपुरात एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५३ वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज मृत्यू होत आहेत. ही वाढती मृत्यूसंख्या सध्या नागपूरच्या चिंतेचे वाढ झाली आहे. ज्या नागपूरने सुरुवातीच्या दिवसात कोविड-१९ ची परिस्थिती यशस्वीपणे हाताळली. त्याच नागपुरात ‘मिशन बिगीन अगेन’ सुरू झाल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसत आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर बंधने असतानाही नागरिक नियम पाळत नाहीत.
हेही वाचा - राज्यात कोरोनाचा नवा उच्चांक; एकाच दिवसात आढळले ९,५१८ रुग्ण..
लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर बंधने असतानाही नागरिक नियम पाळत नाहीत. बाजारात गर्दीवर नियंत्रण नाही. नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडतोय, मास्क वापरणे टाळले जातेय, दोन चाकीवर एकाची परवानगी असताना तीन-तीन जण आणि चारचाकी वाहनात पाच-पाच व्यक्ती विनाकारण फिरत आहेत. ऑटो रिक्षाला परवानगी नसतानाही पाच-पाच प्रवासी त्यातून प्रवास करत आहेत. हे असेच सुरू राहिले तर संपूर्ण नागपूर शहर हा कोविड-१९ चा हॉटस्पॉट होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा आधीच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला होता.
त्यानंतर देखील नागरिक ऐकायला तयार नाहीत. ३१ मे पूर्वी नागपूरात २५ चे ३० दरम्यान प्रतिबंधित क्षेत्र होते. त्याची संख्या आज २०० च्या वर गेली आहे. नागपुरातील कोविडमुळे झालेल्या मृत्यूंचा अभ्यास केला, तेव्हा बहुतांश मृत्यू हे रुग्ण वेळेत समोर न आल्यामुळे झाल्याचे लक्षात आले आहे.