नागपूर - अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि नागपूर शहरातील परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनिता शाहू यांच्या नेतृत्वात सीताबर्डी परिसरातील मुंजे चौक, नेताजी मार्केट, मोदी नंबर १, २, ३ आणि मोबाइल मार्केटमध्ये पोलिसांनी अचानक तपासणी केली. यावेळी कोविड नियमांचे उल्लंघन करताना मोठ्या प्रमाणात व्यापारी आणि इतर नागरिक दिसून आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली असून अशा सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची रॅपिड अँटिजेन कोरोनाचाचणी करण्यात आली आहे.
अनेक व्यापारी लपून करताहेत व्यवसाय
नागपूर शहरातील सीताबर्डी परिसरात मोबाइल मार्केट, कापड मार्केटसह इतर साहित्यांची ठोक बाजारपेठ आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असताना अनेक व्यापारी लपून आपल्या व्यवसाय करत आहेत, ज्यामुळे अशा दुकानांसमोर अनावश्यक गर्दी होत असल्याच्या अनेक तक्रारी पोलीस अधिकाऱ्यांकडे आलेल्या आहेत. त्यामुळे आज अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि डीसीपी विनिता साहू यांच्या नेतृत्वात सीताबर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल सबनीस आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मोबाइल मार्केट परिसर, व्हरायटी चौक, मुंजे चौक, नेताजी मार्केटसह मोदी १, २ आणि ३च्या ओळीत देखील तपासणी केली त्यावेळी व्यापारी आणि नागरिक कोविड नियमांचे उल्लंघन करताना आढळले. पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेऊन त्या सर्वांना अँटिजेन चाचणीसाठी कोविड तपासणी सेंटरला पाठवण्यात आले आहे.