नागपूर - जगभर कोरोना विषाणूची दहशत आहे. देशात आणि राज्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. असे असताना नागपुरातून एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पुढे आली आहे. नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पहिल्या रुग्णाचा कोरोना चाचणीचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यासोबत या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसत होते. त्यांपैकी दोघांचा अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे.
हेही वाचा... कोरोना कहर : जगभरात मागील २४ तासांत १ हजार ९७ जणांचा मृत्यू; चीनपेक्षा इटलीत मृतांची संख्या जास्त
नागपुरात 11 मार्चला एका रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या 45 वर्षीय रुग्णाला शासकीय मेयो रुग्णालयात दाखल करण्यात होते. या रुग्णाच्या संपर्कात आलेले त्याचे दोन सहकारी व पत्नी यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. या तिघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या तिघांपैकी दोघांचा दुसरा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता या तिन्ही रुग्णांची तिसरी तपासणी येत्या काही दिवसात होणार आहे. तिसऱ्या तपासणी अहवालानंतर आरोग्य मंत्रालयाच्या दिशानिर्देशानुसार उपचाराची पुढची दिशा ठरवण्यात येणार आहे.
पहिला रुग्ण - दोन्ही चाचण्या निगेटिव्ह
दुसरा रुग्ण - उपचारानंतर पहिली चाचणी निगेटिव्ह
तिसरा रुग्ण - उपचारानंतर पहिली चाचणी निगेटिव्ह