नागपूर - प्रतिबंधित क्षेत्रात रुग्णाचा झालेला मृत्यू हा प्रशासनाच्या आठमुठ्या कारभारामुळेच झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे. कोरोना ‘हॉटस्पॉट’ परिसरामध्ये मोबाईल डॉक्टर व्हॅन उपलब्ध नसल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. या संदर्भात आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे.
नागपुरातील कोरोना हॉटस्पॉटपैकी एक असलेल्या मोमीनपुरा येथे एका वृद्धेचा मृत्यू झाला होता. या रुग्णाला प्रतिबंधित क्षेत्र असल्यामुळे वेळेवर औषधोपचार मिळाले नाहीत, तसेच वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध होऊ शकल्या नाही. शासनाच्या निर्देशानुसार प्रतिबंधित क्षेत्रात ‘मोबाईल डॉक्टर व्हॅन’ असणे गरजेचे असताना देखील नागपूर शहराच्या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांसाठी अशी सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केला. त्या मृत रुग्णाला वेळेवर औषधोपचार मिळवून देणे मनपा प्रशासनाचे काम होते. मात्र, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना मरणासाठी सोडून दिले असल्याची टीका त्यांनी केली. मुंढे यांनी साथरोग प्रतिबंधक कायद्याच्या नावाखाली संपूर्ण नागपूर शहराला वेठीस धरले असल्याचा आरोप आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे.