नागपूर - अंतिम संस्कार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी अस्थी गोळा करण्यासाठी आलेल्या कुटुंबीयांनी काही अस्थी गहाळ झाल्याची तक्रार केल्याने एकच गोंधळ उडाला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून दोन दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश महापालिकेचे आरोग्य सभापती संजय महाजन यांनी दिले आहेत.
अंतिम संस्कार केल्यानंतर अस्थी गोळा करण्यासाठी आलेल्या कुटुंबीयांनी काही अस्थी गहाळ झाल्याची तक्रार महापालिकेकडे केली आहे. आज (सोमवारी) सकाळी नागपूरच्या गंगाबाई दहन घाटावर हा प्रकार झाला. रविवारी गंगाबाई घाटावर एकूण ११ अंतिम संस्कार झाले. ज्यात ५ लाकडावर, ४ गोवऱ्यावर व १ डिझेल शव दाहिनीवर अंतिम संस्कार पार पडले. यापैकी गोवऱ्यावर अंतिम संस्कार करण्यात आलेल्या मृताच्या कुटुंबीयांनी अस्थींचे काही भाग गहाळ झाल्याचे सांगितले. दहन घाटावर काही अनुचित प्रकार तर होत नसल्याची शंका मृतांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
तक्रार येताच मनपाचे कर्मचारी घाटावर दाखल
अस्थी गहाळ झाल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गंगाबाई दहन घाटावर भेट दिली. गोवऱ्यावर अंतिम संस्कार केल्याने अस्थीखाली दबून जात असल्याची माहिती घाटावरील कर्मचाऱ्यांनी दिली. लाकडावर अंतिम ज्यांचे अंतिम संस्कार झाले त्यांनी मात्र अशा प्रकारची कुठलीही तक्रार केली नाही. तरीही या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून दोन दिवसात अहवाल देण्याचे निर्देश महापालिकेचे आरोग्य सभापती संजय महाजन यांनी दिले आहेत.