नागपूर - कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागपूर महापालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येकाने त्रिस्तरिय फेस मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. घराबाहेर, सार्वजनिक, इतर कोणत्याही ठिकाणी वावरताना मास्क न लावल्यास २०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. या बाबतचे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. एवढेच नाही तर मास्क न वापरल्यामुळे एकाच व्यक्तीकडून तिन वेळा दंड वसूल करण्यात आल्यास त्या व्यक्तीवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. शुक्रवारपासून हे आदेश अंमलात येणार आहेत.
सर्व नागरिक कोरोनाशी लढा देत आहेत. याचा संसर्ग तोंड, नाक आणि डोळ्यांतून जास्त होतो. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक आहे. साथरोग अधिनियम १९८७ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार नागपूर शहर सीमेत सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयाच्या ठिकाणी, वाहतूक करताना व इतर ठिकाणी मास्क लावणे अनिवार्य आहे. मास्क न लावल्यास संबंधित व्यक्तीकडून २०० रूपये दंड आकारण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
नागपूर महापालिकेचे उपद्रव शोध व निर्मूलन पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी, सर्व झोनचे सहायक आयुक्तासह अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे. आपल्यामुळे कुणाला किंवा दुसऱ्यामुळे आपल्याला संसर्ग होऊ नये, यासाठी प्रत्येकानेच मास्क वापरणे आवश्यक आहे. कुठल्याही कामासाठी घराबाहेर निघताना मास्क लावूनच निघावे, असे आवाहनही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.