नागपूर- उपराजधानीत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाची साखळी ब्रेक करण्याच्या उद्देशाने पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी सोमवारपासून नागपुरात कडक संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली होती. आज या संचारबंदीचा तिसरा दिवस आहे. मात्र नागपूरकरांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे या संचार बंदीचा पार फज्जा उडाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
नागपुरातील सर्वच रस्त्यांवर इतर दिवसांप्रमाणेच वाहनांची गर्दी दिसून येते आहे. मात्र, ही गर्दी रोखण्याकरिता पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोनाचे आणखी रुग्ण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
पोलिसांची भूमिका केवळ बघ्याची-
पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी नागपुरात कडक संचारबंदीची घोषणा केल्यानंतर लगेचच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी त्यांनी नमूद केले होते,की नागपुरात कडक संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात येईल. याकरिता सुमारे अडीच हजारांपेक्षा अधिक पोलीस कर्मचारी अधिकारी हे रस्त्यांवर असतील. मात्र प्रत्यक्षात पहिल्या दिवसापासूनच पोलिसांची भूमिका ही केवळ बघ्याची असल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलीस कारवाई करत नसल्याचे बघून बेजबाबदार नागरिकांची हिंमत देखील वाढली आहे,ज्या मुळे शहरात गर्दी वाढताना दिसत आहे.
बेजबाबदार नागरिकांकडे घराबाहेर पडण्याची शेकडो कारणे:-
नागपूर शहरात संचारबंदी लागू होऊन दोन दिवस झाले असून तिसरा दिवस उजाडला आहे. मात्र रस्त्यांवरील गर्दी कमी होण्याऐवजी ती वाढताना दिसते. यासंदर्भात ज्यावेळी लोकांना घराबाहेर पडण्याचे कारण विचारले, त्यावेळी त्यांच्याकडे शेकडो उत्तरं आधीच तयार असतात. मात्र नागपुरकारांच्या याच बेफिकीरीमुळे कोरोना वाढीला पोषक असे वातावरण तयार होत आहे, याची जाणीव नागपुरातील नागरिकांना आहे. मात्र ते देखील बंधनांना कंटाळले असल्यानेच लोक नियम पळत नसल्याचा सूर लोकांच्या बोलण्यातून उमटला आहे