नागपूर- चार दिवसांपूर्वी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करत रेल्वे कोचमध्ये कोविड रुग्णांवर नागपूर येथे उपचार केले जाणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार सर्व ११ कोच तयार झालेले आहेत. कोविड साथीच्या आजारात रुग्णावर उपचार करण्यासाठी, रेल्वेने कोच तयार केले आहेत. भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शना नुसार हे कोच कोविड केअर सेंटर म्हणून वापरले जाणार आहेत.
कोविड केअर कोच' नागपूर महापालिकेच्या स्वाधीन
११ डब्ब्यांची (गैर-वातानुकूलित) रॅक आणि वैद्यकीय कर्मचा-यांसाठी एक कोच हे इनलँड कंटेनर डेपो, अजनी येथे ठेवण्यात आले आहेत. रविवारी रेल्वेच्या वतीने हे 'कोविड केअर कोच' नागपूर महानगरपालिकेच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नागपूर विभाग, मध्य रेल्वे आणि नागपूर महानगरपालिका आयुक्त यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार रेल्वे आणि नागपूर महानगरपालिकेची कर्तव्ये व जबाबदा-या निर्धारित करण्यात आल्या आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, आलोक कंसल यांनी रेल्वेच्या विभागांना सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
अशी आहे कोच व्यवस्था:-
वैद्यकीय कर्मचार्यांच्या डोनींग आणि डॉफिंगसाठी, वैद्यकीय साहित्य आणि वैद्यकीय उपकरणे ठेवण्यासाठी एक कोच वापरला जाईल. बाकीचे ११ कोच कोविड केअर सेंटर म्हणून वापरले जातील, जेथे प्रत्येक कोचमध्ये १६ रुग्ण म्हणजेच प्रत्येक कम्पार्टमेंट मध्ये ०२ रुग्ण (एकूण १७६ बेड) ॲडमिट केले जाऊ शकतात. प्रत्येक कोचमध्ये स्टँडसह २ ऑक्सिजन सिलिंडर्स देण्यात आले आहेत. प्रत्येक खिडकीला डास प्रतिबंधक जाळी पुरविली गेली असून प्रत्येक कोचमध्ये नऊ विंडो कूलर बसविण्यात आले आहेत. उन्हाळ्याच्या काळात तापमान कमी करण्यासाठी कोचिंगच्या छतावर कूलिंग सिस्टम पुरविण्यात आले आहे. सर्व कोचमध्ये पाणी व विद्युत सुविधा देण्यात आल्या आहेत. कोच आणि बेडच्या वापरासाठी ठिकठिकाणी मार्गदर्शक चिन्हे देण्यात येत आहेत.
कोणत्या रुग्णांना दाखल करता येईल?-
लक्षण नसलेली किंवा सौम्य लक्षणे असलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना या कोचमध्ये हलविण्यात येईल. कोणत्याही वाईट परिस्थितीत किंवा रुग्णाची लक्षणे/परिस्थिती बिघडू लागल्यास रुग्णांना तातडीने उच्च केंद्रात म्हणजेच समर्पित कोविड रुग्णालयात स्थलांतरित करण्यासाठी या डब्यांजवळ २४ तास रुग्णवाहिका उपलब्ध असेल. मनपाने नेमलेले वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर आणि कर्मचारी येथील कोचमधील रुग्णांना सेवा देणार आहेत.