नागपूर - संचारबंदी दरम्यान विनाकारण दुचाकीने घराबाहेर पडलेल्या दोन महिलांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्यापैकी एका महिलेने अक्षरशः राडा (गोंधळ) घातला आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे नाराज झालेल्या या महिलेने भर रस्त्यात पोलिसांशी हुज्जत घातली आहे. एवढेच नाही तर दुचाकीतील पेट्रोल काढून आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने पोलिसांनी त्या महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या महिलेचे रौद्ररुप पाहून पोलिसांना तात्पुरती माघार घ्यावी लागली. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
15 मार्चपासून नागपूर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी दरम्यान एका दुचाकीवर केवळ एकाच व्यक्तीला प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. असे असतानाही विनाकारण घराबाहेर पडलेल्या दोन महिलांवर इतवारी भागात वाहतूक पोलिसांकडून भागात कार्यवाही करत असताना गोंधळ घातला. या दोन्ही महिला पोलिसांची नजर चुकवत इतवारीच्या छोट्या गल्लीतून पळून जात होत्या. मात्र, तिथे असलेल्या पोलिसांनी त्यांना थांबवत चालान कारवाई केली. त्यामुळे संतपलेल्या महिलेने तिथे गोंधळ घातला. सरकारने कोणतेही विचार न करता संचारबंदी लावल्याचा ओरड ही महिला करत होती. इतकेच नाही तर पाईपच्या साहायाने दुचाकीतून पेट्रोल काढून पेटवून घेण्याचा प्रयत्न देखील तिने केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत तिला दूर नेले. या प्रकरणी महिलेवर सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - खासगी बसची मालमोटारीला धडक, मध्यप्रदेशातील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू
हेही वाचा - नागपुरात कोरोनाचे थैमान सुरु असताना ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस