नागपूर - पत्नी आणि दोन मुलांची हत्या (Wife and Children Murder) करून पतीने आत्महत्या (Husband Suicide) केल्याची धक्कादायक घटना नागपूरमधील जरीपटका परिसरातील दयानंद पार्कजवळ घडली. यामध्ये पतीनेच पत्नी आणि दोन मुलांचा चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर स्वतः सुद्धा गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.
- पत्नी आणि दोन मुलांची केली हत्या -
ही घटना मंगळवारी सकाळच्या दरम्यान घडली असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. आज सकाळपासूनच घरांमधून कुठलीही हालचाल होताना न दिसल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनीसुद्धा परिसरात राहणाऱ्या कुटुंबीयांना बोलावून आतून बंद असलेल्या घराचे दार तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरामध्ये प्रवेश केला तेंव्हा कुटुंबप्रमुख मदन अग्रवाल यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. तसेच पत्नी किरण, मुलगा आणि मुलगी हे तिघेही चाकूने वार केल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडून होते.
- आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा संशय -
मदन अग्रवाल यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःचे घर विकून त्याच परिसरात काही अंतरावर भाड्याच्या घरात राहायला आले होते. आर्थिक विवंचनेतून त्यांनी घर विकले असावे अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच ते चायनीज पदार्थ बनवण्याचे काम करत होते. याच परिसरात मदन चायनीजवाला या नावाने ते प्रसिद्ध होता.