नागपूर - कोरोनामुळे बडग्या मारबत उत्सव साजरा करण्यावर प्रशासनाने निर्बंध घातले आहे. मात्र, परंपरा खंडीत होऊ नये, यासाठी उद्या ५ लोकांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने मारबतीचे पूजन करण्यात येणार आहे. पिवळी मारबत स्थानापन्न झाली असली तरी मिरवणूक निघणार नाही. त्यामुळे भाविक दर्शनासाठी पोहचू लागले आहेत. पिवळी मारबत म्हणजे चांगल्या परंपरेचे प्रतिक आहे. वाईट परंपरा, रोगराई, संकट समाजातून घालवण्यासाठी देखील नागपूरकर पिवळ्या मारबतची पूजा करतात.
मारबत आणि बडग्या हा जगातील एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त नागपूरातच पार पाडतो. मात्र, कोरोनामुळे इतिहासात पहिल्यांदाच तान्हा पोळ्याला म्हणजेच उद्या निघणारी मारबत-बडग्याची मिरवणूक यंदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे परंपरेबरोबर सामाजिक प्रश्नांवर प्रहार करणारा मारबत-बडग्या उत्सव यंदा मिरवणूकीशिवाय नागपूरकरांना अनुभवावा लागणार आहेत. रोगराई, समाजातील अनिष्ट रुढी, लोकांच्या 'ईडा पिडा घेऊन जा गे मारबत' अशी आरोळी देत दरवर्षी नागपूरकर पाडव्याच्या दिवशी मोठ्या उत्साहाने काळ्या आणि पिवळ्या मारबतची मिरवणूक काढातात.
हेही वाचा - 'धार्मिक स्थळे उघडा' मागणीला जोर; विविध धर्मियांची शासनाकडे मागणी
त्यासोबत वर्तमान राजकारण, भ्रष्टाचार, दहशतवाद अशा मुद्यांवर लक्ष वेधणारे बडगे ही या मिरवणुकीत काढले जायचे. या मिरवणुकीच्या माध्यमातून वाईट शक्तीं (बडगे) शहराबाहेर नेऊन त्यांचे दहन करण्याची नागपूरची 136 वर्षांची परंपरा आहे. यंदा कोरोना संक्रमणामुळे मारबत आणि बडग्यांची मिरवणूक निघणार नाही. त्यामुळे लोक पिवळ्या मारबतीचे फोटो मोबाईलवर एकमेकांना पाठवत दर्शन घेत आहेत.
जागनाथ बुधवारी परिसरात परंपरेनुसार तयार झालेली पिवळी मारबतचे दर्शन घेण्यासाठी नागरिक येत आहेत. उद्याची मिरवणूक रद्द झाली असली, तरीही परंपरा खंडीत होऊ नये, यासाठी उद्या 5 लोकांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने मारबतीचे पुजन करण्यात येणार आहे.