नागपूर - आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान झालेल्या गोंधळाच्या विरोधात आज (सोमवार) भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासमोर तीव्र आंदोलन केले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष बघायला मिळाला. संतप्त झालेल्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी ऐनवेळी पुतळा जप्त केल्यामुळे आंदोलकांचा बेत फसला त्यामुळे भाजयुमोचे कार्यकर्ते आणखीच संतप्त झाले होते. त्यांनी पोलिसांची गाडी अडवून धरली, मात्र त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करून रस्त्या मोकळा केला.
- परीक्षेत गोंधळ झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान -
आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ उडाल्याने परीक्षार्थींना नाहक त्रास सहन करावा लागला. परीक्षे आधीच प्रश्न पत्रिका फुटल्याचा आरोप देखील झाले आहे. सलग तिसऱ्यांदा परीक्षेत गोंधळ झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे, यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे हेच जबाबदार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
- राजेश टोपे यांच्या राजीनाम्याची मागणी -
परीक्षेआधी झालेल्या गोंधळामुळे गेल्या महिन्यात आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करावी लागली होती, त्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेत सुद्धा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या गोंधळाला आरोग्य विभागाचे ढिसाळ नियोजन कारणीभूत असल्याचा आरोप करत भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.