नागपूर - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात गोव्यात भाजपची एकहाती सत्ता (Goa BJP) आली. त्यानंतर ते आज नागपुरात आले असून, भाजपकडून विजयी जल्लोष रॅली (BJP Rally in Nagpur) काढण्यात आली. आता 'मिशन महाराष्ट्र 2024' डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कामाला लागा असा हुंकार भरणारा सूर या जल्लोष रॅलीतून दिसून आला. गोव्याच्या विजयानंतर महाराष्ट्रात आता भगवा फडकणार, असे सूतोवाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जाहीर सभेत केले. तसेच महाराष्ट्रात 2024 मध्ये भाजपची एकहाती सत्ता आणणार, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलून दाखवला.
गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाल्यानंतर पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते तथा गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस हे नागपुरात आले होते. त्यामुळे नागपूर भाजपाच्यावतीने नागपूर विमानतळापासून विजयी रॅली काढली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या रॅलीत हजारो कार्यकर्त्यांनी सहभागी होत फुलांचा वर्षाव करत विजयी जल्लोष साजरा केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी जाऊन पाया पडून त्यांचा आशिर्वाद घेतले. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी औक्षण करत फडणवीस यांचे स्वागत केले.
गोव्यात पहिल्यांदा भाजपला एकहाती सत्ता मिळाली -
यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, गोव्यात दिवंगत मनोहर पर्रीकर असतानासुद्धा घटक पक्षाला सोबत घेऊनच सरकार बनवावे लागले होते. पण, यावेळी पहिल्यांदाच गोव्याच्या निवडणुकीचा प्रभार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला यावेळी मोठे यश गोव्यात मिळाले. यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. गोव्यात सुरू झालेला विजय आता इथेच थांबणार नसून, महाराष्ट्रातही लवकरच भगवा फडकणार, असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
दोन पक्ष एकत्र आले पण नोटांपेक्षा कमी ठरले-
गोव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकत्र आले. मात्र, नोटा पेक्षाही जास्त मते ते मिळू शकले नाहीत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी विजयी जल्लोष जाहीर सभेत समाचार घेतला. महाराष्ट्रात परिवर्तनाची लहर असून, महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचार विरोधी लढ्यात सामान्य जनता ही भाजपसोबत आहे, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
महाराष्ट्रात आता भाजपची एकहाती सत्ता येणार -
महाराष्ट्र सरकारचा भ्रष्टाचाराचा बुरखा टराटरा फाडलेला आहे. सामान्य जनता आता समजून गेलेली आहे. हे महाविकास आघाडी सरकार नसून, केवळ वसुली करण्याकरिता सत्तेवर आलेले सरकार आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. या सरकारचे दोन मंत्री जेलमध्ये हवा खात आहेत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांविरुद्ध खोट्या केसेस करण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनाही फसवण्याचा प्रयत्न केला आहे. पण, असे कितीही प्रयत्न झाले तरी भाजप महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्टाचारी चेहरा जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही महाविकास आघाडी सरकारला दिला. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, महानगर पालिकेच्या आणि त्यानंतर राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही भाजप आता एकहाती सत्ता आणेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवला. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांमध्येसुद्धा मोठा उत्साह संचारलेला या जल्लोष रॅलीतून पाहायला मिळाला.