नागपूर - महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोंडी करत असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. ते आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा युतीचे सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. त्याचबरोबर, भाजप आणि शिवसेनेने अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा प्रस्तवा त्यांनी मांडला.
हेही वाचा - नागपूर : आसीनगर झोन कार्यालयात कचरा टाकून आंदोलन
आज बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी कधीही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेससोबत मैत्री केली नसती, असेही आठवले म्हणाले.
आत्मघातकी निर्णय
पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करून महाविकास आघाडी सरकारने अतिशय आत्मघातकी निर्णय घेतल्याची टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या घटक पक्षांमध्ये मतभेद स्पष्टपणे दिसून येत आहेत, त्यामुळे हे सरकार आणखी किती दिवस टिकेल यासंदर्भात शंका वाटत असल्याचे आठवले म्हणाले.
प्रत्येक प्रकल्पाला बाळासाहेबांचे नाव देण्याची गरज काय? - आठवले
नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले जाणार असल्याचे आता जवळजवळ निश्चित झाले आहे. यावर आठवले यांनी प्रश्न उपस्थित केला. या विमानतळाला लोकनेते दि.बा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीला देखील त्यांनी समर्थन दिले. राज्यातील प्रत्येक प्रकल्पाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची गरज काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळण्यात राज्य अपयशी
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते, त्यानंतर ते आरक्षण न्यायालयात टिकले देखील होते, मात्र सध्याचे सरकार या कामात कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. मराठा समाजाला आरक्षणाची किती गरज आहे, हे पटवून देण्यात राज्यसरकार अपयशी ठरल्याची टीका आठवले यांनी केली. एवढेच नव्हे तर, देशभरातील क्षत्रिय समाजाला १० ते १२ टक्के आरक्षण देण्याच्या मागणीला रामदास आठवले यांनी समर्थन दिले आहे. संविधानात संशोधन केल्यास पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येणे शक्य असल्यास देखील त्यांनी सांगितले.
हेही वाचा - नागपुरात धोकादायक इमराती दीडशे पार, महापालिकेने बजावली नोटीस