नागपूर - वाढीव वीज बिलच्या निषेधार्थ आज ( सोमवार) भाजप महिला मोर्चाच्या वतीने थेट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घरासमोर जन आंदोलन करण्यात आले. ३०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्याच्या मागणीसह कोविडच्या काळातले वाढीव वीज बिल सर्वसामान्यांवर अन्यायकारक असल्याच्या घोषणा देत 'ऊर्जामत्री जागे व्हा' असे आव्हानही यावेळी भाजप महिला मोर्चाच्यावतीने करण्यात आले. याचबरोबर या आंदोलनाची दखल ऊर्जामंत्र्यांनी घेतली नाही तर आत्मदहन करण्याचा ईशाराही यावेळी देण्यात आला.
वाढीव वीज बिलावरून भाजप पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसून आले. नागपुरात आज भाजप महिला आघाडी मोर्चाच्या वतीने थेट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घरासमोर जन आंदोलन करण्यात आले. नागपूरच्या उपमहापौर मनीषा कोठे व भाजप महिला आघाडी मोर्चा अध्यक्ष किर्तीदा अजमेरा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना अव्वा चे सव्वा वीज बिल सरकारकडून पाठवण्यात आले. त्यामुळे ऊर्जामंत्र्यांनी लॉकडाऊनच्या ३ महिन्याच्या कालावधीतील ३०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करावे, सोबतच ७ टक्के वाढीव वीज बिल एका वर्षासाठी रद्द करावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आधीच सर्वसामान्य नागरिक कोरोनामुळे त्रस्त असताना हे वाढीव वीज बिल पाठवून सरकार व ऊर्जामंत्री आर्थिक पेच निर्माण करत असल्याचे आरोप यावेळी उपमहापौर मनीषा कोठे यांनी केले. ऊर्जामंत्र्यांनी या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आत्मदहन करण्याचा ईशाराही यावेळी उपमहापौरांनी दिला. असे असले तरी निवेदन स्विकारण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत उपस्थित नसल्याने 'ऊर्जामंत्री घाबरले का '? असा सवालही महिला मोर्चाच्या वतीने उपस्थित करण्यात आला. त्यामुळे ऊर्जामंत्री उपस्थित नसल्याने हे निवेदन त्यांच्या कार्यलयातील अधिकाऱ्यांकडे सुपुर्त करून 'ऊर्जामंत्री मुर्दाबाद' च्या घोषणा देत भाजप महिला आघाडी च्या शिष्ठमंडळांना परताव लागलं.