नागपूर - राज्य सरकारच्या कामकाजावर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केली आहे. हे सरकार केवळ विदर्भ विरोधीच नाही तर कुंभाकर्णी झोपेत असल्याचा टोला त्यांनी लावला आहे. विदर्भावर अन्याय करण्याचे काँगेस राष्ट्रवादीचे धोरण या सरकारने सुद्धा अंगीकारले आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच राज्य सरकारवर 420 चा गुन्हा दाखल करण्याची मागणीही मुनगंटीवारांनी केली आहे.
नागपूर कराराचा भंग-
महाविकास आघाडी सरकारने नागपूर कराराचा भंग केल्याचा आरोपही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. त्यामुळे या सरकारवर 420 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. नागपूर करारानुसार वर्षांतून काही विशिष्ट काळासाठी सरकार अधिकृतपणे नागपूर येथे हलविण्यात येईल आणि राज्य कायदे मंडळाचे किमान एक तरी अधिवेशन दरवर्षी नागपुरात घेण्यात येईल, अशी तरतूद करण्यात आली होती.
त्या संशोधनासाठी राज्य सरकारला नोबेल दिला पाहिजे-
कुंभकर्ण तरी 6 महिने झोप घेत होता, मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार त्यापेक्षा मोठ्या झोपेत असल्याची बोचरी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. सरकारच्या सुपीक डोक्यात कल्पना आली की मुंबईत अधिवेशन घेतले की कोरोना कमी होतो आणि नागपूरमध्ये अधिवेशन घेतले की कोरोना वाढतो. यावर त्यांनी रिसर्च पेपर केला आहे का? या संशोधनासाठी राज्य सरकारला नोबेल पुरस्कार दिला पाहिजे, असे चिमटे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काढले आहेत.
हे सरकार विदर्भावर अन्याय करणारे असून विदर्भ वैज्ञानीक विकास महा मंडळाचा कार्यभार एप्रिल महिन्यात संपला असताना देखील त्याची पुनर्रचना केली नाही. हिवाळी अधिवेशन देखील मुंबईत हलविले, त्यामुळे विदर्भावर अन्याय करणार सरकार आहे. निदान विदर्भवाद्यांचे नेतृत्व करणाऱ्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी तरी याला विरोध करायला हवा होती, अशी अपेक्षाही मुनगंटीवारांनी यावेळी व्यक्त केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घ्या- मुनगंटीवार
हिवाळी अधिवेशन मुंबईला पळवल्यानंतर पुन्हा एकदा विदर्भावर अन्याय झाल्याची भावना समाजात निर्माण होत आहे. मात्र, पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेऊ अशी घोषणा करण्याचे सौजन्य देखील या सरकारने दाखवले नसल्याची खंत मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.