नागपूर - ज्या वीज ग्राहकांची वीजजोडणी कापण्यासाठी महावितरणचे कर्मचारी येतील त्यांना वीजजोडणी तोडू देऊ नका, भाजपा अशा वीज ग्राहकांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची माहिती राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
'सरकारला नामोहरम करणार'
गेल्या 10 महिन्यात ज्यांनी वीजबिल भरले नाही त्या ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्यास महावितरणने सुरुवात केली आहे. मात्र सरकारची ही मोगलशाही असून भाजपा याविरुद्ध जोरदार आंदोलन करून सरकारला नामोहरम करणार, असे ते म्हणाले. राज्यातील सरकार लाखो वीज ग्राहकांच्या वीज जोडण्या तोडण्यास निघाले आहे. भाजपा सरकारने कधीही वीज जोडण्या तोडल्या नव्हत्या, अशातच करोना संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना वीज जोडण्या तोडणे म्हणजे शेतकऱ्यांच्या हातून पुढचा हंगामही काढून घेणे असल्याचा आरोप त्यांनी केला.
भांडणापोटी जनतेला अडचणीत आणत असल्याचा आरोप
वीजबिल माफीसाठी 5 हजार कोटींची व्यवस्था करणे सरकारसाठी मोठी बाब नाही. मात्र महाविकास आघाडी सरकार भांडणापोटी जनतेला अडचणीत आणत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. एकीकडे भाजपा वीजबिल माफीसाठी आक्रमक असताना काँग्रेस पेट्रोल दराबद्दल आरडाओरड करीत आहेत. मात्र पेट्रोलवरील राज्य सरकारच्या भरमसाठ कराबद्दल काँग्रेस काहीच बोलत नसल्याचे ते यावेळी म्हणाले.
'इंधनाचे दर कमी करण्यासाठी नानांनी पुढाकार घ्यावा'
नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पेट्रोलवरील राज्य सरकारचा कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा. भाजपा सरकारच्या काळात जिल्हा नियोजन निधीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली होती. त्या निधीत मोठ्या प्रमाणात हे सरकार कपात करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.