नागपूर - नागपूरमध्ये ओबीसीच्या आरक्षणासाठी भाजपकडून चक्काजाम आंदोलनाचे बॅनर लावण्यात आले होते. यातच गोवारी उड्डाण पुलावर लावलेल्या भाजपच्या बॅनरवर काँग्रेसकडून बॅनर लावत कुरघोडी करण्यात आली. यामुळे काहीवेळ व्हयरायटी चौकात गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या बॅनरवर काँग्रेसकडून 'जरा याद करो कुर्बानी' अशा आशयाचे वाक्य लिहित भाजपने ओबीसी समाजातील नेत्यांचे खच्चीकरण केल्याचे दर्शविण्यात आले होते. यावेळी या फलकावर पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे, विनोद तावडे या ओबीसी नेत्यांचे फोटो लावण्यात आले होते. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अक्षय हेटे यांचे नाव असलेले हे बॅनर होते. दरम्यान, या बॅनरने परिसरातील सर्वांचे लक्ष वेधले होते. काही वेळाने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हे बॅनर काढून टाकले. मात्र, काही वेळ गोंधळ उडालेला पाहायला मिळाला.
'ओबीसी नेत्यांचे हाल विसरू नका'
काही काळाने हे बॅनर काढून टाकले असले, तरी बॅनर लावल्यानंतर बराचवेळ याच विषयाची चर्चा सर्वत्र रंगली होती. ओबीसींना राजकीय आरक्षण देऊन निवडणुका रद्द कराव्यात या मागणीसाठी आंदोलन असतांना, या बॅनरवर ओबीसी बांधवांनो, या संघीय राजकारणाला बळी पडू नका, ओबीसी नेत्यांचे हाल विसरू नका, जो शाहिद हुये उनकी जरा याद करो, कुर्बानी करो अशा ओळी लिहल्या होत्या. तसेच, या ओळींखाली पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे, आणि विनोद तावडे यांचे फोटो लावण्यात आले होते. या फोटोंखाली 'जय ओबीसी' असा मजकूरही लिहिण्यात आला होता.
'राज्यात ओबीसीचा नेता कोणी असेल, तर फक्त फडणवीस-बावनकुळे'
ओबीसी आरक्षण संदर्भात संपूर्ण प्रकरणाचा मी साक्षीदार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. भाजपचे सरकार असताना अनेक बैठका वर्षा या शासकीय निवास्थानी झाल्या आहेत. ओबीसीचे आरक्षण टिकवण्यासाठी (31 जुलै)ला नोटिफिकेशन काढण्यात आले. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात मला तीन जिल्ह्याचा पालकमंत्री बनवण्यात आले. महत्वाचे मंत्रीपद देण्यात आले. राज्यात जर ओबीसी समाजाचा नेता कोणी असेल, तर तो देवेंद्र फडणवीस हे आहेत, असेही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.