नागपूर - देशात लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू असताना शहरातील निर्मनुष्य झालेल्या रस्त्यावर आज व्हायोलिनचे सूर घुमू लागले. बंदोबस्तावर असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा वाढदिवस पोलीस कर्मचारी आणि सामाजिक संघटनेचे दोन कार्यकर्त्यांनी साजरा केला. याच वेळी एका कलाकाराने चक्क व्हायोलिन वाजवून हा वाढदिवस स्पेशल बनवला.
शहरातील व्हेरायटी चौकात हे सुखावणारे दृश्य कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अनुभवायला मिळाले. लॉकडाऊनमुळे शहराच्या मध्यभागी असलेल्या व्हेरायटी चौकात मागील अनेक दिवस पोलिसांची नाकाबंदी सुरू आहे. या परिसरातून शहराच्या चहुबाजूंनी प्रमुख रस्ते जात असल्याने त्या ठिकाणी पोलीस सतत तैनात आहेत. अशातच बंदोबस्तावर असलेले पोलीस उपनिरीक्षक गणेश भोयर यांचा आज वाढदिवस आल्याने दुपारी रस्त्यावरच तो साजरा करण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचारी कुटुंबापासून लांब असल्याने त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी देखील दिली. स्वराज फाऊंडेशन या संघटनेने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचा ताण काही क्षणांसाठी दूर व्हावा, यासाठी व्हायोलिन वादकांना त्या ठिकाणी बोलावले. यामुळे लॉकडाऊच्या तणावात पोलिसांना काही आनंदाचे क्षण व्यतित करता आले.