नागपूर - बिमान बांगलादेश एअरलाईन्सच्या वैमानिकाचा हृदयविकाराच्या झटक्यानंतर उपचारादरम्यान नागपुरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. वैमानिकाला शुक्रवारी (27 ऑगस्ट) छातीत तीव्र त्रास झाल्याने आपत्कालीन परिस्थितीत विमान नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर उतरवण्यात आले होते. यात 45 वर्षीय नौशाद नामक वैमानिकावर किंग्जवे रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. पण सोमवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती बांगलादेश प्रवक्ता ताहेरा खांडकर यांनी दिली.
- वैमानिकाला झाला होता हृदयविकाराचा त्रास -
बिमान बांगलादेश एअरलाईन्सचे विमान हे छत्तीसगडच्या रायपूरपासून भारतीय एअर स्पेसमधून जात होते. यावेळी वैमानिकाला हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. यावेळी कोलकाता एटीसीला याची माहिती कळवण्यात आली. यामुळे नागपूर हे सर्वात जवळचे विमानतळ असल्याने नागपूर विमानतळाशी संपर्क करत विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग सहकारी पायलटने केली.
यानंतर 45 वर्षीय वैमानिक नौशाद याला तत्काळ रुग्णवाहिकेच्या साह्याने खासगी रुग्णालयात दाखल करत उपचार सुरू करण्यात आले आहे. नौशाद नामक या वैमानिकावर डॉक्टरांनी शर्थीचे उपचार सुरू केले. पण प्रकृती खालावत गेल्याने अखेर सोमवारी त्या वैमानिकाचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून बांगलादेशाच्या संबंधीत यंत्रणांना कळवण्यात आले. मृतदेह बांगलादेशला पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
- प्रवाशांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली -
या विमानामध्ये जवळपास 126 प्रवासी होते. विमान नागपुरात उतरल्यानंतर सर्व प्रवासी हे नागपूर विमानतळावर थांबले होते. बांगलादेशच्या बिमान एअरलाईन्सने पर्यायी व्यवस्था करून ते विमान प्रवाशांना घेऊन ढाका येथे पोहचवले.
हेही वाचा - बांगलादेशी विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग, पायलटला हृदयविकाराचा त्रास