नागपूर - मे महिन्यात आलेल्या वादळामुळे ( storm ) मुळासकट उन्मळून पडलेल्या सुमारे 150 वर्ष जुन्या वडाच्या झाडाला ( Banyan Tree ) नवजीवन देण्यात मनपाच्या उद्यान विभागाला ( Municipal Park Department ) यश आले आहे. गोरेवाडा तलावाजवळील ( Gorewada Lake ) शासकीय क्वाटर्स परिसरात झाडाचे पुनर्रोपण करण्यात आले असून उद्यान विभागाच्या या कामगिरीबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी विभागाच्या चमूचे अभिनंदन केले आहे.
जुन्या या झाडाचा घेर १७ फुट - २४ मे रोजी नागपूर शहरात जोराचे वादळ आले. या वादळामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्याच्या घटना घडली होती. मात्र, यासोबतच झोन मधील गोरेवाडा तलावाजवळील क्वाटर्स परिसरात असलेले जुने विशाल वडाचे झाड ( Banyan Tree ) मुळासकट कोलमडून पडले होते. सुमारे १५० वर्ष जुन्या या झाडाचा घेर १७ फुट एवढा आहे. या झाडाच्या पुनर्रोपणाचा निर्णय मनपाद्वारे घेण्यात आला. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार उपायुक्त रवींद्र भेलावे यांच्या मार्गदर्शनात उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार व त्यांच्या चमूने झाडाच्या पुनर्रोपणाचे आव्हान स्वीकारले होते.
झाडाला नवजीवन असे दिले - उद्यान विभागाच्या कर्मचा-यांनी पडलेल्या झाडाच्या सर्व फांद्या छाटल्या. मुळापासून वरती २० फुटापर्यंत झाडाची उंची ठेवण्यात आली. हे करताना मनपाच्या कारखाना विभागाद्वारे जेसीबीने २५ फुट रुंद, आणि १२ फुट खोल मोठा खड्डा खणण्यात आला. झाडाचे यशस्वी पुनर्रोपण करून ते पुढे जगावे यादृष्टीने पूर्ण काळजी घेण्यात आली. खणलेल्या खड्ड्याचे झाडाच्या वाढीच्या दृष्टीने निर्जंतुकीकरण करण्यात आले. माती, खत सर्व टाकण्यात आले होते.
२५ दिवसांची प्रक्रिया यशस्वी - झाडाच्या फांद्या कापताना झाडाचा तोल हळुहळू खड्ड्याकडे झुकला जात असल्याने कुठल्याही क्रेनचा आधार न घेता झाडाचे सहजतेने पुनर्रोपण करण्यात उद्यान विभागाला यश आले. झाडाच्या पुनर्रोपनाची प्रक्रिया सुमारे २० ते २५ दिवस चालल्याचे उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी यावेळी सांगितले आहे.
झाडाचे पुनर्रोपण झाल्यानंतर झाडाला जगविण्यासाठी आवश्यक घटकांची पूर्तता करण्यासाठी उद्यान विभागाद्वारे विशेष प्रयत्न करण्यात आले होते.
मुळे विकसीत करण्यासाठी औषधोपचार - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे वनशेती विभागप्रमुख व्ही.एम. इल्लोरकर यांच्या सल्ल्यानुसार झाडाची मुळे विकसीत करण्यासाठी औषधोपचार करण्यात आला. त्यांच्या सल्ल्यानुसार झाडाच्या आजुबाजूला 4 पाईप टाकण्यात आले आहेत. यामध्ये मोठ्या पाईपाद्वारे उन्हाळ्यात झाडाला पाणी दिले जाते. तर इतर 3 पाईपांद्वारे झाडाच्या वाढीसाठी आवश्यक ‘ग्रोथ हार्मोन्स’चा पुरवठा केला जातो.
प्रत्येक फांदीवर नवीन पालवी - मे महिन्यातील वादळानंतर पुन्हा ऊन वाढली, आणि पुढे जुलै महिन्यात सतत मुसळधार पाऊस सुरू होता. मात्र, अशाही परिस्थितीत झाड टिकून आहे ही बाब आनंददायी आहे. आज झाडाच्या प्रत्येक फांदीवर नवीन पालवी फुटू लागली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत १५० वर्ष जुने झाड वाचवून त्याला नवजीवन देण्यासाठी मनपाच्या उद्यान आणि इतर विभागाच्या कर्मचा-यांनी समन्वयाने एकत्रितरित्या काम केले. या सर्वांच्या कार्यामुळे झाडाला नवजीवन देता आल्याची भावना उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - Uddhav Thackeray : एकनाथ शिंदें यांनी वाईट पद्धतीने मुख्यमंत्री पद मिळविले- उद्धव ठाकरे
हेही वाचा - Uday Samant : अनंत गितेंचीच भूमिका एकनाथ शिंदे पुढे घेऊन जाताहेत, मग गितेही गद्दार का? उदय सामंतांचा प्रश्न