नागपूर - नियमबाह्य शुल्क आकारणाऱ्या खासगी शाळांवर कडक पाऊल उचलण्याचे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज दिले आहेत. हे निर्देश त्यांनी खासगी शाळांच्या वाढीव शुल्काबाबतच्या सेंट उर्सुला शाळेतील बैठकीत दिले आहेत.
वाढीव शालेय शुल्कावरून गेल्या काही महिन्यापासून पालक संघटना आक्रमक झाल्याचे दिसून आले. याचीच दखल घेत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नागपूरात आज बैठक बोलावली होती. यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी व पालकांसोबत बच्चू कडू यांनी चर्चा केली. खासगी शाळाकडून वाढविण्यात आलेल्या शुल्काबाबतचा लेखाजोखा शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतला. कारवाईस पात्र असणाऱ्या विरोधात कडक पाऊलसुद्धा उचलण्यात येणार असल्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. या बैठकीत पालकांचे वाढीव शुल्काबाबत मत जाणून घेण्यात आले.
खासगी शाळांकडून थेट १५ टक्के शुल्क वाढ करण्यात आल्याचे आरोप यावेळी पालकांकडून करण्यात आला. या संदर्भातही बैठकीत चर्चा करण्यात आली. शुल्क वाढविणाऱ्या खासगी शाळांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी पालकांकडून करण्यात आली आहे. शुल्क वाढीबाबत बच्चू कडू यांना पालकांकडून निवेदन देण्यात आले होते. त्यानंतरच एक समिती गठित करत ही बैठक बोलवण्यात आली होती. शाळांकडून शालेय कायद्याचे पालन न करता अवैधपणे शुल्क वाढ करण्यात येत असल्याचे यावेळी पालकांनी सांगितले. त्यामुळे अशा सगळ्या खासगी शाळांवर कारवाईचे आदेश बच्चू कडू यांनी दिल्याचे पालक सोनाली भांडारकर यांनी सांगितले.
कोरोनामुळे राज्यातील सर्वच शाळा बंदच आहे. मात्र, अनेक शाळांकडून अव्वाच्या सव्वा शालेय शुल्क आकारण्यात येत आहे. या संदर्भात नागपुरात पालकांकडून अनेकवेळा आंदोलने करण्यात आली आहेत.