नागपूर - भटक्या समाजाचा एक तरुण शिक्षणाच्या प्रवाहात येतो, उच्चशिक्षित होतो. त्यानंतर स्वतःच्या आयुष्यात बदल घवडत असताना उच्च पदावर नौकरी न करता समाजातील दुरावस्था सुधारण्याचा विडा घेऊन दुचाकीवर निघतो. पाच वर्षांपूर्वी त्याने भटक्या समाजाची भटकंती दूर करण्यासाठी स्वतः 88 हजार किलोमीटरची भटकंती केली आहे. घरापासून दूर निघालेला हा तरुण घराबाहेर पडला. पण त्यानंतर त्याचे पाऊल घराच्या दिशेने वळलेच नाही. संजय कदम, असे या 27 वर्षीय तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा - VIDEO : माळी समाजाला स्थानिक स्वराज संस्थांमध्ये लोकसंख्यच्या तुलनेत नेतृत्व मिळाले; माळी महासंघाची मागणी
पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडचा हा तरुण 7 ऑक्टोबर 2017 मध्ये घराबाहेर पडला. संजय कदम हा युवक स्वतःची ओळख एक भारतीय अशी करून देतो. प्रत्येक जण मी त्या जातीचा त्या धर्माचा असे सांगतो. पण, भारतीय असल्याचे कोणीच सांगत नाही. त्यामुळे, एक तिर एक कमान सब भारतीय एक समान, अशी स्वतःची ओळख संजय करून देतो. 'भटका' हा शब्दच मुळात हीन आणि वेगळे असल्याची वागणूक करून देणारा शब्द आहे. त्यामुळे, भटकंती करणारा समाज एका ठिकाणी स्थिर व्हावा म्हणून घुमन्तु घुमक्कड, अर्धघुमन्त जाती जमाती जोडो अभियानाला सुरवात केली आहे.
यामध्ये जी लोक विविध राज्यात ज्या भागात, गावापासून दूर वस्त्यांवर, वाड्यांवर, पाल टाकून आकाशाला छत समजून आपले राहोटी करतात त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्या समस्यांची माहिती घेण्याचे काम या अभियानातून केले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे लोटून सुद्धा समाज शिक्षणापासून दूर राहिला. उलट अशिक्षितपणा, मागासलेपणा व्यसनाधीनता आणि यातून गुन्हेगार अशी दुरावस्था समाजातील तरुणांची झाली. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना व्यसनाधीनतेपासून दूर करण्यासाठी जनजागृती करण्याचे काम संजय कदम या तरुणाने सुरू केले आहे.
भटक्या समाजाचा डेटा देऊन स्वतंत्र अनुसुचीची मागणी - याच जनजागृती मोहिमेत संजय कदम याने 20 राज्यांत 88 हजार किलोमीटर प्रवास केला. दिवस रात्र भटकंती करत मिळेल तिथे राहणे, लोकांशी त्यांच्या भाषेत बोलून त्यांना यात्रेचा उद्देश समजावून सांगत भटकंती सुरू आहे. या प्रवासात 2 कोटी लोकांशी भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्याचा दावा संजय याने केला आहे. या भटक्या समाजाचा डेटा गोळा करून डिसेंबर महिन्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच सामाजिक न्याय विभाग, घुमन्तु घुमक्कड अर्धघुमन्तू वेल्फेअर बोर्डचे अध्यक्ष यांना सोपवणार असल्याचे संजयने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सागितले. या भटक्या विमुक्त समाजासाठी डीएनटी कॅटेगरी निर्माण करून त्यांच्या समस्यांना सोडवण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर पावले उचलण्याची मागणी केली. स्वतंत्र अनुसूची (कॅटेगिरी) करूनच त्यांना मुख्य प्रवाहात आणल्या जाऊ शकेल असेही ते सांगतात.
शिक्षणाच्या प्रवाहात आल्यावर विकास होणे शक्य - या जनजागृती यात्रेचे चांगले परिणाम काही भागात दिसून आले. त्यामुळे, समाजात काही शिकलेल्या मुलांनी इतरांना शिकवत शैक्षणिक वर्ग सुरू केलेत. काही शिक्षित तरुणांच्या माध्यमातून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहचवण्याचे काम केले जात आहे. यामाध्यमातून सुशिक्षित तरुणांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःचा विकास साधण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. वर्ग विविध वस्त्यांवर सुरू आहे, असा दवा संजय कदमने केला आहे. यामागे त्याने एकदा शिक्षण मिळाले की, ते त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतील, असेही संजय सांगतो.
हेही वाचा - Video : हत्येच्या आरोपात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांचा परिसराला घेराव