नागपूर - केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थाना बाहेर एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. काल संध्याकाळी ही घटना घडली आहे. विजय मारोतराव पवार (५५) असे या वक्तीचे नाव असून ते बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील रहिवासी आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिसांसह सुरक्षा रक्षकांनी विजय पवार यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
म्हणून केला आत्मदहनाचा प्रयत्न -
विजय पवार यांनी पंढरपूर ते शेगाव पालखी मार्गाचे रुंदीकरणासह सिमेंट रस्त्याचा दर्जा सुधारणे तसेच रस्त्यावरचे अतिक्रमण काढण्याचे काम गणेश विसर्जनानंतर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी केली होती. प्रशासनाने त्यांना लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र, गणेश विसर्जनानंतर सुद्धा त्याबाबत पुर्तता झाली नसल्याने प्रशासनाच्या दिरंगाईच्या निषेधार्थ विजय मारोतराव पवार यांनी नितीन गडकरी यांच्या घराजवळ आत्मदहनाचा प्रयत्न केला. विजय मारोतराव पवार यांनी अंगावर टाकलेले द्रव्य काही प्रमाणात त्यांच्या तोंडात गेल्यामुळे त्यांची प्रकृती काही प्रमाणात बिघडली होती. पोलिसांनी विजय पवार यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
हेही वाचा - धक्कादायक! नागपूरमध्ये 11 वर्षीय मुलीच्या कौमार्याचा विक्री करणाऱ्या तीन महिलांना अटक