नागपूर - नागपूर मध्यवर्ती कारागृहात झालेल्या हाणामारीत एक कैदी गंभीर जखमी झाला, तर झटापट सोडवायला गेलेले दोन जण किरकोळ जखमी झाले असल्याची घटना घडली आहे. राजू वर्मा असे जखमी कैद्याचे तर विवेक पालटकर असे हल्ला करणाऱ्या कैद्याचे नाव आहे. विवेक पालटकर हा पाच जणांच्या हत्येच्या आरोपात कारागृहात न्यायबंदी आहे. शनिवारी (काल) संध्याकाळच्या सुमारास विवेकने राजू वर्मा नावाच्या एका कैद्यांवर अचानकपणे जोरदार हल्ला केला. कापडात दगड बांधून त्याने राजू वर्मावर हल्ला केला. कैद्यांची हजेरी घेताना हा हल्ला झाल्याने वर्माला वाचवण्यासाठी उपस्थित कारागृह कर्मचारी व दुसरे कैदी धावले. यावेळी हल्लेखोर विवेक पालटकर यांचेशी झालेल्या झटापटीत दोन इतर कैदी देखील जखमी झाले आहेत. या हल्ल्यात राजू वर्माच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी शासकीय मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मेडिकलमधील उपचारानंतर जखमी राजू वर्माला कारागृहातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर विवेक पालटकर याला अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. या दोन्ही कैद्यात कुठला वाद होता की अचानक विवेक पालटकर आक्रमक का झाला, याचा तपास कारागृह प्रशासन करीत आहे.
विवेकने बहिणीचे संपूर्ण कुटुंबच संपवले होते
नागपूरच्या दिघोरी परिसरात जून २०१८ विवेक पालटकरने जावई, बहीण, जावयाची वृद्ध आई, १२ वर्षीय भाची व स्वःताच्या ४ वर्षीय मुलाचा निर्घृण खून केला होता. याप्रकरणी तो नागपूर कारागृहात न्यायालयीन बंदी आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून विवेकचे वागणे हे सामान्य होते, मात्र अचानक त्याने सह कैद्यावर हल्ला कोणत्या कारणाने केला या संदर्भात उलघडा होऊ शकलेला नाही.
हेही वाचा -अहमदनगरमध्ये रेशनचा काळाबाजार; ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त