नागपूर - आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. तसेच आचारसंहिता लागल्यापासून सर्व राजकीय पक्ष निवडणुकीची तयारी करीत आहेत. मात्र, काँग्रेसचे नेते हे फक्त स्वतःच्या मतदार संघाचाच विचार करत असल्याचा टोला आशिष देशमुख यांनी लावला आहे.
आगामी निवडणूकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. यानिमीत्त राजकीय पक्षांनी सभा, दौरे, यात्रा इत्यादींची सपाटा लावला आहे. मात्र, काँग्रेस पक्ष पाहिजे त्या प्रमाणात सक्रीय झाला नसून अपेक्षित प्रभावी असा प्रचार पक्षाकडून केला जात नसल्याची खंत आशिष देशमुखांनी व्यक्त केली आहे. तसेच, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे फक्त संगमनेर मतदारसंघातच व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
हेही वाचा - भाजप सरकारचा शिवस्मारकात कोट्यवधींचा भ्रष्टाचार; काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप
देशमुख पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षातील नेत्यांनी शरद पवारांकडे बघून काही शिकायला हवे. शरद पावरांची तब्येत बरी नसतानादेखील, ते राष्ट्रवादीच्या मोर्चा बांधणीसाठी स्वतः पुढाकार घेत आहेत. किमान काँग्रेसच्या नेत्यांनी पवारांकडे बघून तरी कामाला लागावे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - अशोक चव्हाण यांनी निवडणूक लढवू नये, तावडेंचा अजब सल्ला