नागपूर - शहरातील यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माजरी रेल्वे पुलाजवळ एका २७ वर्षीय तरुणाचा खून झाला आहे. रियाजउद्दीन जलालउद्दीन अन्सारी असे मृत तरुणाचे नाव असून अजहर, मोहम्मद जावेद आणि मुशीर नामक तीन आरोपींनी त्याचा खून केला. क्षुल्लक कारणावरून उद्भवलेल्या वादातून आरोपींनी संगनमत करून रियाजउद्दीन अन्सारी याचा खून केला. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे.
तत्काळ अटक
सोमवारी रात्री उशिरा यशोधरा पोलिसांना माहिती सूचना मिळाली, की मांजरा पुलाजवळ दोन गटात हाणामारी झालेली आहे. या सूचनेच्या आधारे पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा एका तरुणावर चाकूने हल्ला झालेला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर काही वेळातच रियाजउद्दीन जलालउद्दीन अन्सारी नामक तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्याच परिसरात लपून बसलेल्या अजहर, मोहम्मद जावेद आणि मुशीर नामक तीन आरोपींनी अटक केली.
वादाचे कारण
मृतक रियाजउद्दीन अन्सारी आणि आरोपी अजहर यांचे एकमेकांनच्या शेजारी पान ठेला आहे. कुणाच्या ठेल्यावर ग्राहक जास्त येतात, या विषयावरून दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. त्यातच काल रात्री उशिरा पुन्हा या दोघांमध्ये वाद उफाळून आला असताना आरोपी अझहर याने मोहम्मद जावेद आणि मुशीर नामक या दोन मित्रांच्या मदतीने रियाजउद्दीन अन्सारीवर चाकूने वार करून खून केला.
उपराजधानीत ११ दिवसात सहा खून
नवीन वर्ष सुरू झाल्यापासून उप-राजधानी नागपूरात दर दिवसाला खुनाच्या घटना घडून लागल्या आहेत. जानेवारी महिन्याच्या केवळ १२ दिवसांमध्ये तब्बल सहापेक्षा जास्त खुनाच्या घटना घडल्या आहेत. नागपूर शहरात पुन्हा एका इसमाचा खून झाल्याची घटना घडली आहे.