नागपूर - शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून आज अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारला. डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांच्याकडून हा पदभार स्वीकारण्यात आला. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणे, हाच मुख्य उद्देश असल्याचे मतही अमितेश कुमार यांनी यावेळी मांडले. पोलीस आयुक्त कार्यालयात हा पदभार स्वीकारण्यात आला.
नागपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीला नियंत्रणात आणण्यासाठी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांनी कमालीची कामगिरी केली. दोन वर्षाच्या कालावधीत नागपुरात अनेक गुन्हेगारांच्या मुसक्याही आयुक्तांच्या प्रयत्नामुळे आवळण्यात आल्या. डॉ. भूषण कुमार यांची बदली मुंबई येथे करण्यात आली आहे. त्याच्या जागी नवे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांची वर्णी लागली आहे. आज सकाळीच ते नागपुरात दाखल झाले.
पोलीस आयुक्त कार्यालयात अमितेश कुमार यांनी हा पदभार स्वीकारला. यावेळी शहरातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आयुक्त म्हणून उत्तमरित्या आपली भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी अमितेश कुमार हे देखील शहराची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडतील हा आशावाद नागपूरकरांना आहे. अमितेश कुमार हे याआधी नागपुरात कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या कामगिरीबाबत अनेकांमधे सकारात्मक चर्चा आहे. शिवाय शहरातील सद्यस्थिती पाहता नवे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार कोणती पावले उचलतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
अमितेशकुमार हे १९९५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते २००५ ते २००७ या काळात नागपूर शहर पोलीस दलातील परिमंडळ - २चे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यावेळी मॅच फिक्सिंगच्या प्रकरणाला त्यांनी वाचा फोडली होती.