नागपूर - शहरातील अजनी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला एक लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. राजेशसिंग ठाकूर असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे पोलीस विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे रेल्वेमध्ये पार्सल ठेकेदारीचे काम करतात. त्यांनी नितीन नारनवरे यांचेकडून शताब्दी चौक येथे प्लॉट खरेदीचा करारनामा केला होता. मात्र त्या प्लॉटवर गोपालसिंग राजपूत नावाच्या एक व्यक्तीने कबाडीचे दुकान लावून अतिक्रमण केले होते. त्याबाबत तक्रारदार हे गोपाल कबाडीवाल्याशी प्लॉटवरील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात बोलले असता, गोपालसिंग व तकारदार यांचे भांडण झाले. त्यामुळे गोपालसिंगने तक्रारदाराविरुद्ध अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणात तक्रारदाराला अटक सुद्धा झाली होती. दरम्यान तक्रारदार हे पोलीस कस्टडीत असताना तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजेशसिंग ठाकूर यांनी तक्रारदाराच्या शताब्दी चौकातील प्लॉटवरील अतिक्रमण हटवण्याच्या मोबदल्यात तीन लाख रुपयांची मागणी केली. पोलीस उपनिरीक्षक राजेशसिंग ठाकूर यांनी मागणी केलेली लाच रक्कम देण्याची तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. तकारदाराने दिलेल्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सापळा रचून लाचखोर आरोपी पोलीस उपनिरीक्षक राजेशसिंग ठाकूर याला तडजोडी अंती एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध अजनी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक ठाकूर याच्या घराची झडती सुरू आहे.