नागपूर- शहर गुन्हे शाखेच्या पथकाने एका अट्टल वाहन चोरट्याला अटक केली आहे. पोलिसांनी या चोरट्याकडून एक स्कॉर्पिओ, दोन मालवाहू टाटा एससह सहा दुचाक्या जप्त केल्या आहेत. विजय महादेव बाहेकर (वय २९) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
आरोपी नागपूर शहरातून चोरलेले वाहन मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात जाऊन विकत असल्याचा खुलासा झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून नागपूर शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी एक पथक कामाला लावले होते. त्या दरम्यान एम.आय.डी.सी परिसरातील भिमनगर येथून एक मालवाहू वाहन अज्ञात चोरांनी चोरून नेल्याची तक्रार दाखल झाली होती. पोलीस उपनिरीक्षक मयूर चौरसिया आणि त्यांचा स्टॉफ अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना त्या वाहनात असलेला मोबाईल सुरू झाल्याने पोलिसांना तपासाची दिशा मिळाली होती.
नंतर सायबर सेलच्या मदतीने आरोपीचा शोध घेत असता गुप्त बातमीदाराने त्याच्या घराचा पत्ता शोधून काढला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला त्याला त्याच्या घरातून अटक केली. आरोपी विजय बाहेकर याने वाहन चोरीच्या नऊ घटनांची कबुली पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून महिन्द्रा कंपनीची स्कॉर्पिओसह दोन टाटा एस या मालवाहू गाड्या जप्त केल्या आहेत.
शिवाय बाहेकर याने नागपूर शहरातून चोरलेल्या ४ दुचाक्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट येथे विकल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी सध्या सहा दुचाक्या जप्त केल्या असून आणखी मुद्देमाल जप्त होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागपूर-पुणे मार्गावर धावणार १५ अतिरिक्त 'शिवशाही'