नागपूर - लॉक झालेली बंदूक अनलॉक करताना अचानक बंदुकीतून गोळी सुटल्याने एक पोलीस शिपाई जखमी झाल्याची घटना नागपूर शहरातील बेलतरोडी पोलीस ठाण्यासमोरच घडली आहे. जखमी पोलीस शिपायचे नाव शेषकुमार इंगळे असे आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून ते धोक्याबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे.
गोळी घुसली डाव्या पायाच्या मांडीत
शेषकुमार इंगळे यांची बदली नुकतीच बेलतरोडी पोलीस ठाण्यात झाली आहे. ते आपल्या सहकाऱ्यांसोबत चहा पिण्यासाठी पोलीस ठाण्यासमोरच्या ठेल्यावर गेले होते. त्यादरम्यान बंदूक लॉक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ती अनलॉक करण्याचा प्रयत्न केला असता अचानक बंदुकीतून गोळी सुटली. ती गोळी त्यांच्या डाव्या पायाच्या मांडीत शिरली. फायरच्या आवाजाने पोलीस ठाण्याचा परिसर हादरून गेला होता. समोरच पोलीस ठाणे असल्याने त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी शेषकुमार इंगळे यांच्याकडे धाव घेतली. सहकाऱ्यांनी लगेच त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
घटनेची चौकशी होणार -
शेषकुमार यांच्या बंदुकीतून गोळी फायरची घटना घडली आहे. अनावधानाने सुटलेली गोळी त्यांच्या मांडीत गेली आहे. ही घटना कशी घडली? त्यांनी बंदूक हाताळताना निष्काळजीपणा केला का? यासह अनेक बाजूने या घटनेची चौकशी केली जाणार आहे.
हेही वाचा - conversion case धर्मांतरण प्रकरणी युपी एटीएसकडून नागपूरमध्ये तिघांना अटक