नागपूर - नागपुरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवर आळा घालायचा असेल आणि गुन्हेगारांचे कंबरडे मोडायचे असेल तर पोलीस यंत्रणा सक्षम करणे महत्त्वाचे आहे. पोलिसांची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने नागपूर पोलिसांच्या ताफ्यात 14 चारचाकी आणि 72 दुचाकी वाहने सहभागी झाले आहेत. जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत ही वाहने खरेदी करण्यात आली आहेत. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते या वाहनांना हिरवी झेंडी दाखवून कर्तव्यावर रवाना करण्यात आले आहे. यावेळी नागपूर शहाराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासह सर्व पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त आणि पोलीस निरीक्षक उपस्थित होते.
राज्याच्या उपराजधानीचा मान असलेल्या नागपूर शहराला क्राईम कॅपिटल, असेही म्हंटले जाते. नागपूरमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांची वाढती संख्या नेहमीच चिंतेचा विषय राहिलेला आहे. तब्बल सात वर्षे राज्याचे गृहमंत्रीपद नागपूरकडे असतानाही गुन्ह्यांची संख्या कमी झाली नाही किंवा गुन्हेगारांवर वचक बसवता आले नाही. मात्र, आता गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी नागपूर पोलिसांचे हात मजबूत करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांना वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
गस्तीवर दिला जाणार सर्वाधिक भर
नागपूर शहराचे 30 पोलीस ठाण्यात विभाजन करण्यात आले आहेत. शहराचा व्याप लक्षात घेता पोलिसांनी 116 बिट तयार केले आहेत. ज्या ठिकाणी गुन्हेगारी घटना सर्वाधिक घडतात किंवा या ठिकाणी गुन्हेगारांचा वावर असतो. अशा भागासह शहरातील प्रत्येक भागात पोलिसांचे अस्तित्व दिसावे. यासाठी चार्ली मार्शलकडून गस्तीवर सर्वाधिक भर दिला जाणार आहे. पेट्रोलिंग करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून शहरातील 116 बिटवर पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्यात 14 चारचाकी व 72 दुचाकी देण्यात आल्या आहेत.
466 कर्मचाऱ्यांची नियुक्ती - आयुक्त
शहरातील 116 बिटवर विविध पोलीस ठाण्यातील 466 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना गस्त घालताना फरार आरोपीला शोधणे, महिलांची मदत करणे, रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवणे, कंट्रोल रुमला येणारे कॉल्स अटेंड करणे या सारखे काम देण्यात येणार आहेत.
हेही वाचा - विदर्भ विकास मंडळ नको, स्वतंत्र विदर्भ पाहिजे- विदर्भावाद्यांचे राज्यपालांना निवेदन