नागपूर - खरंतर लहान मुलांचे बोबडे बोल हे कुतूहलाचा विषय असतात. पण मुलगी संस्कृत सारखे बडबडते म्हणून तिला भूतबाधा झाल्याचा समज आई वडिलांनी करून घेतला. यात तिच्यावर उपचार करण्यासाठी दवाखान्यात घेवून न जाता तिला मांत्रिकाकडे नेले. सहा वर्षीय चिमुकलीच्या ( Murder of six year old child Nagpur ) शरीरात दृष्ट आत्म्याने प्रवेश केला असल्याचे मांत्रिकाने सांगितले. त्यासाठी तिला मारण्याचा सल्ला दिला. यातूनच चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे कृत्य आई वडिलांनीच केले असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
नागपूरच्या सुभाषनगर भागात राहणारे सिद्धार्थ चिमणे आणि रंजना चिमणे यांना दोन मुली आहे. एक मुलगी 16 वर्षाची असून दुसरी सहा वर्षाची आहे. यात पोलिसांनी जेव्हा तपासा दरम्यान विचारपूस केली तेव्हा ती काही तरी संस्कृतमध्ये बडबड करत असल्याचे सांगत तिला भूतबाधा झाली, असा दावा आई वडिलांनी केला. सिद्धार्थची मेव्हणी प्रिया अमर बनसोड हिने ही भोंदू बाबांच्या मनाने ऐकून तिघांनी चिमुकलीला बेदम मारहाण केली. मागील 15 दिवसांपासून सातत्याने हा प्रकार सुरू असून अखेर शुक्रवारी झालेल्या बेदम मारहाणमध्ये सहा वर्षीय चिमुकली निपचित पडली. जेव्हा तिला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात नेण्यात आले, तेव्हा तिचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. मृतदेह सोडून आई वडील पळ काढला होता. मात्र राणा प्रतापनगर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे चौकशी करून तिघांना अटक केली आहे. तसेच नागपूर जवळ एका धार्मिक स्थळावर स्वतःला मांत्रिक म्हणून घेत असलेला शंकर बाबा नामक इसमाला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या हाती लागले मारहाणीचे व्हिडिओ : या प्रकरणात चिमुकलीला पूजा करत मारहाण करतांनाचे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहे. चिमुकलीच्या शरीरात दृष्ट आत्मा असल्याने ती बडबड करते तसेच तीचे हाव भाव बदलेल असल्याचे पोलीस तपासात सांगितले. त्यामुळे तिच्या अंगावर फोटो लावत पूजा केली. यात मारहाण केले, तसेच कैचीन कान कापेल, नाक कापेल, अशा पद्धतीने भीती दाखवत त्या चिमुकलीला यातना दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत असल्याचे समोर आले. या घृणास्पद प्रकारात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या तिघे ताब्यात असून चौथा आरोपी शंकरबाबा सुद्धा पोलिसांच्या अटकेत आहे.