नागपूर - ऑटो रिक्षात बसून महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे.
शहरातील जरीपटका भागातून एक महिला निर्धारित स्थळी पोहोचण्यासाठी रिक्षा थांबवते; आणि शेअरिंग पद्धतीने त्यात बसते. मात्र या रिक्षात आधीच दोन महिला असतात. त्यापैकी एक स्वतःला उलटी येत असल्याचा बहाणा करते, आणि खाली उतरण्याच्या प्रयत्नात दुसरी महिला पीडितेच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास करते. संबंधित पीडित महिलेच्या हा प्रकार लक्षात येईपर्यंत रिक्षा चालक व चोरी करणाऱ्या महिला तिथून निघून गेलेल्या असतात.
हेही वाचा औषधांचा परवडणाऱ्या दरात पुरेसा पुरवठा करा; केंद्राचे राज्यांना निर्देश
नागपूरमधील एका महिलेसोबत असा प्रकार घडला. यानंतर तिने पोलिसांना माहिती दिली. सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिसांनी संबंधित रिक्षाचा शोध लावला. यानंतर रिक्षाचा परवाना नांदेडमधील असल्याचे समोर आले. तसेच या महिला आणि चालक हे वर्ध्याचे असून चोरी करण्यासाठी ते नागपुरात येत असल्याचा खुलासा जरीपटका पोलिसांच्या तपासात झाला आहे.