नागपूर - दगडाने ठेचून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना नागपूर शहराच्या सीमेवर असलेल्या वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निलडोह परिसरात उघडकीस आली. अतुल उर्फ लक्ष बाबासाहेब लक्षकर (वय १७) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वाडी पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून लक्षच्या मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे, शिवाय या खुनाच्या मागील कारणांचा शोध देखील सुरू केला आहे.
हेही वाचा - नागपूर-वर्धा मार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, परिचारिकेचा जागीच मृत्यू
पोलिसांच्या माहितीनुसार, अतुल उर्फ लक्ष बुधवार पासून बेपत्ता होता. आज त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह डिफेन्स परिसरातील अमर नगरातील मोकळ्या जागेत आढळून आला. डोक्यावर दगडाने वार केल्याने मृतदेहाची ओळख पटवणे कठीण झाले होते, मात्र अंगावरील कपड्यांमुळे तो मृतदेह अतुल उर्फ लक्ष बाबासाहेब लक्षकर याचा असल्याचे निष्पन्न झाले.
घटनेची माहिती समजताच वाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते, या शिवाय गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने हे देखील त्या ठिकाणी पोहचले होते. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी अतुल उर्फ लक्षचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवून तपास सुरू केला आहे. लक्ष हा एका कॅन्टीनमध्ये कामाला होता, मात्र लॉकडाऊनमुळे कॅन्टीन बंद असल्याने तो सध्या बेरोजगार झाला होता. धक्कादायक म्हणजे, गेल्या सात वर्षांपासून लक्षची आई आणि बहीण बेपत्ता आहे.
लक्षच्या खून प्रकरणात नातेवाईकावर संशय
लक्षचे वडील बाबासाहेब लक्षकर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, एका जवळच्या नातेवाईकावर संशय आहे. त्याआधारे पोलिसांनी त्या नातेवाईकाची चौकशी सुरू केल्याची माहिती पुढे आली आहे. हा नातेवाईक लक्षला अनेक वेळा जिवे मारण्याची धमकी देत असल्याचा खुलासा झाला आहे.
हेही वाचा - पोलीस वसाहतीमध्येच चोरी; कोविड सेंटरमधून २३ पंख्यासह अनेक वस्तू लंपास करणार अटकेत