नागपूर - गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. ४ दिवस बरसल्यावर पावसाने दडी मारली होती. तापमानात वाढ झाल्याने पावसाळ्यात देखील सुर्याचा प्रकोप नगपूरकरांना सहन करावा लागत होता. मात्र, १५ मिनिटे वाऱ्यासह बरसलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
पावसाच्या प्रतिक्षेत तग धरलेल्या पिकांना दिलासा मिळालेला आहे. जूनचा संपूर्ण महिना पावसाविना गेला. मृग नक्षत्रावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, जुलै महिन्यात ही पावसाचा पत्ताच नव्हता. काही वेळासाठीच आलेल्या पावसामुळे बळीराजा मात्र सुखावला आहे. येत्या काही दिवसात मुसळधार पावसाची आवश्यकता आहे. पाऊस पडल्यानंतरच शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळण्याची शक्यता आहे. ज्यांच्या पेरण्या अपूर्ण आहेत त्या शेतकऱ्यांनादेखील पेरण्या पूर्ण करता येणार आहेत.