नागपूर - नागपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. रविवारी आलेल्या चाचणी अहवालात पूर्व विदर्भात 1710 तर नागपूर जिल्ह्यात 1271 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर दिवसभरात कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 7 जण हे नागपूर जिल्ह्यातील आहेत, तर तीन जण हे वर्धा जिल्ह्यातील आहेत.
नागपूर जिल्ह्यात शनिवार आणि रविवार दोन दिवस कडक संचारबंदी करण्यात आली होती, मात्र संचारबंदी असून देखील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढतच आहे, नागपूर शहरामध्ये रविवारी तब्बल 1037 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पूर्व विदर्भाची रविवारची कोरोना आकडेवारी
नागपुरात 1271 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, 1160 जणांनी कोरोनावर मात केली आहे. भंडारा येथे 38 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, 20 जण कोरोनातून बरे झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात 86 रुग्णाची भर पडली असून, 42 कोरोनातून मुक्त झाले आहेत. गोंदीयात 15 बाधित आढळून आले असून, 24 कोरोनातून बरे झाले. वर्ध्यात 274 पॉझिटिव्ह आले असून, 252 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात 26 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, 7 जण कोरोनामुक्त झाले आहेत.