नागपूर - एका १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून ५० लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार शहरातील चपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सोहेल खान, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून अटक केलेल्यांपैकी एक जण अल्पवयीन आहे. महत्त्वाचे म्हणजे या घटनेतील अल्पवयीन आरोपी हा त्या मुलीच्या घरी कामाला होता.
पाचपावली पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार दाखल -
मोहम्मद नईम अशरफ अब्दुल जब्बार यांचे गंगाबाई घाट परिसरात ऑटो-स्पेअर पार्ट विक्रीचे दुकान आहे. त्यामुळे घरात पैसे नेहमी उपलब्ध असतात, याची कल्पना आरोपींकडे काम करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला होती. काही दिवसांपूर्वी त्या आरोपीने मोहम्मद नईम यांच्याकडील काम सोडले होते. मात्र, त्याने या संदर्भात सोहेल खान नामक आरोपीसह अन्य एका सहकाऱ्याला या संदर्भात माहिती दिली. दोन्ही आरोपींनी मोहम्मद नईम यांची १२ वर्षीय मुलगी रिदा फातिमाचे अपहरण करून ५० लाखांची खंडणी वसूल करण्याचा कट रचला. त्यानुसार आरोपींनी रिदाचे अपहरण करून तिच्या गळ्याला चाकू लावला आणि घरून ५० लाख रुपये आणण्याची धमकी दिली होती. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. त्यामुळे तिच्या वागणुकीत सुद्धा विचित्र बदल दिसून आला. कुटुंबातील सदस्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली, तेव्हा त्या भेदारलेल्या रिदाने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी या घटनेची तक्रार पाचपावली पोलीस ठाण्यात दाखल करताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे.