नागपूर - आज (मंगळवारी) उपराजधानी नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रोजच्या पेक्षा निम्याने कमी झाल्याचे आकडे आरोग्य विभागाकडून प्राप्त झाले आहेत. आज केवळ १,१५६ नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. अर्थात आज केवळ ४,६०४ लोकांचीच कोरोना चाचणी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात आणि जिल्ह्यात तब्बल १५ ते १७ हजार कोरोना टेस्ट केल्या जात होत्या. ज्यामध्ये दरदिवशी साडेतीन ते चार हजार रुग्ण कोरोनाबाधित आढळत होते.
धुलीवंदनाच्या निमित्त बरीच कोरोना चाचणी केंद्र बंद राहिल्याने कोरोनाबधितांचे आकडे कमी झाले आहेत. कोरोना बधितांचे आकडे जरी कमी दिसत असले तरी ५४ नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून नागपुरात मृत्यूचा आकडा वाढतानाच दिसतोय. ज्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे
मंगळवारी १,१९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या नागपुरात एकूण अॅक्टिव्ह असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ३८,२०९ इतकी झाली आहे तर आत्तापर्यंत नागपुरात ५,०४० नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे
चार दिवसात २२१ कोरोना बधितांचा मृत्यू -
नागपूर शहरात ज्या वेगाने कोरोना बाधित रुग्ण पुढे येत आहेत, त्याच वेगाने कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू देखील होत असल्याचे आकडे पुढे आले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा नागपुरातील मृतांचा आकडा हा ५० पेक्षा जास्त नोंदवण्यात आला आहे.
मंगळवारी कोरोनाबधितांचे झालेले मृत्यू - ५४
सोमवारी कोरोनाबधितांचे झालेले मृत्यू - ५५
रविवारी कोरोनाबधितांचे झालेले मृत्यू - ५८
शनिवारी कोरोना बधितांचे झालेले मृत्यू - ५४