मुंबई - दहावी उत्तीर्ण विद्यार्थी कोरोनामुळे त्यांच्या मूळ गावी अडकले असून काहीजणांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे दहावीला उत्तीर्ण होऊनही या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घेणे शक्य झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये. यासाठी प्रवेश प्रक्रियेची शेवटची एक फेरी राबवण्यात यावी, अशी विनंती युवासेना व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.
आर्थिक परिस्थिती प्रवेश घेता आला नाही -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द केली आहे. तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर करण्यात आलेला होता. यामुळे अकरावी प्रवेशाबाबद विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला होता. राज्य शिक्षण महामंडळाने यंदा अकरावी प्रवेशासाठी प्रथमच प्रवेश परीक्षा घेणार आहे. मात्र, त्यानंतर अकरावी प्रवेशासाठी नियोजित सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) मुंबई उच्च न्यायालयाने रद्द करण्याचा निर्णय दिला होता. तसेच उच्च न्यायालयाने केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या अकरावी प्रवेश सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे,त्यानुसार अकरावी प्रवेश प्रकिया सुरुही झाली होती. मात्र, दहावी उत्तीर्ण विद्यार्थी कोरोनामुळे त्यांच्या मूळ गावी अडकले असून, काहीजणांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे दहावीला उत्तीर्ण होऊनही या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घेणे शक्य झालेले नाही.
युवासेनाकडे आल्या तक्रारी -
यासंदर्भात विद्यार्थ्यांकडून अनेक तक्रारी युवासेना तसेच मुंबई उपसंचालक कार्यालयाकडे आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत युवासेनेने शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आणखी एक संधी द्यावी. अशी मागणी करणारे निवेदन मुंबई उपसंचालक संदीप संगवे यांना दिले. या निवेदनामध्ये विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये. यासाठी प्रवेश प्रक्रियेची शेवटची एक फेरी राबवण्यात यावी, अशी विनंती युवासेना व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी केली आहे. या निवेदनावर दोन दिवसासाठी शेवटची फेरी सुरू करण्याचे आश्वासन संगवे यांनी दिल्याचे सावंत यांनी सांगितले.
हेही वाचा - रश्मी ठाकरे मुख्यमंत्री होणार, हे खरंय का?