मुंबई - सध्या राज्यभरातील वातावरण पाहिलं तर, तरुण हे ड्रग्सच्या विळख्यात सापडत चालला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ड्रग्सच्या आहारी गेलेल्या महाराष्ट्रातील तरुणांना बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेस लवकरच अभियान राबवणार आहे. राज्यातील शक्य होईल तेवढ्या महाविद्यालयात जाऊन युवक काँग्रेसचे कार्यकर्ते तरुणांना ड्रगपासून परावृत्त करण्यासाठी काम करणार असल्याची माहिती महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली आहे.
हेही वाचा - भारत सीरिजच्या देशातील पहिल्या वाहनाची नोंदणी मुंबईत!
तसेच ड्रगच्या आहारी गेलेल्या तरुणांना इतर देशांमधील व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठवले जाते. मात्र, आपल्या देशात त्या तरुणांना तुरुंगात डांबले जाते. त्यापेक्षा या तरुणांना ड्रगच्या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचेही सत्यजित तांबे म्हणाले आहेत.
- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी युवक काँग्रेस मैदानात -
काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस हा मुख्य पक्ष आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. या निवडणुकांमध्ये काँग्रेसला बळ देण्यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे एक हजार कार्यकर्ते मैदानात उतरून मतदारांपर्यंत पोहोचणार आहेत. तसेच या निवडणुकांसाठी काम करणार असल्याची माहितीही सत्यजित तांबे यांनी दिली आहे.
- युवक काँग्रेसच्या नवीन कार्यकारणीसाठी होणार निवडणूक -
महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या कार्यकारणीसाठी निवडणूक 12 नोव्हेंबरला घेतली जाणार आहे. ही निवडणूक पूर्णता ऑनलाइन माध्यमातून होणार आहे. 27 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरावा, असे आवाहन सत्यजित तांबे यांनी केले आहे. राज्यात साडेआठ लाख युवक काँग्रेसचे सदस्य असून सर्वांना यासाठी 12 नोव्हेंबरला ऑनलाईन पद्धतीने मतदान करता येणार असल्याचे तांबे म्हणाले.
हेही वाचा - Aryan Khan Drug Case : दिलासा नाहीच, उद्या पुन्हा उच्च न्यायालयात होणार सुनावणी